
परतीच्या पावसामुळे शेतात सडलेल्या सोयाबीन व मका पिकांचे कृषी विभाग व विमा कंपन्यांनी तातडीने पंचनामे करावे अशी मागणी राहाता शहरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राहाता तालुक्यातील हजारो एकर शेतातील सोंगलेली व उभ्या असलेल्या सोयाबीनला मोड फुटले तर काही पाण्यात सडून गेली आहेत. मक्याचेही तेच झाले कनस मोडून जमिनीवर टेकली व पाऊस सुरू झाला. त्या कनसांनाही मोड फुटू लागले असून हाता तोंडाशी आलेले पिक डोळ्या समोर वाया जाताना पाहायची वेळ शेतकऱ्यांवर आली. अजूनही पाऊस उघडत नसून शेतात पाय ठेवता आलेला नाही. शेत व पिक पाण्यात बुडाली असून गुडभर पाय शेतात जातात यामुळे पाणी जिरेपर्यंत त्या पिकात काही राहण्याची तिळमात्र शक्यता राहिलेली नाही. या सोयाबीन व मका पिकांचे शेतकऱ्यांनी विमे उतरविले असून विमा कंपनी व कृषी विभागाने त्याचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली व नुकसानग्रस्त पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून सरसकट पंचनामे करावे अशी मागणी केली. याला कृषी अधिकाऱ्यांनी अद्याप सरकारचे पंचनामे करण्याचे आदेश दिले नसून आदेश आल्यानंतर पंचनामे करू असे सांगितले. विमा कंपनीचे अधिकारी येथे आलेच नाही. त्यांनी दुरध्वनी वरून सांगितले मी काही भागाची पाहणी केली असू पाहणी करताना चिखलात पडल्याने माझा पाय मनरगळला असून मी कंपनीला याबाबत माहीती कळवले असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
आजारापेक्षा विलाज कठीण विमा कंपन्यांच्या नवीन नियमाला शेतकऱ्यांचा विरोध
ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला आहे. पावसाने त्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यांनी विम्याचे अॅप डाऊनलोड करावे विशिष्ट फॉर्म असून तो भरावा 7/11 उताऱ्यावर विमा भरलेल्या पिकाची नोंद करावी. तो अर्ज 7/12 उतारा घेऊन शेतात पिकात उभे राहून विशिष्ट अँगलने पिक व नुकसानीचे फोटो काढून विमा पावती अॅपवर डाऊनलोड करावे ते विमा कंपनीचे अधिकारी पाहतील. तेव्हाच ते ग्राह्य अशी नविन अट घातल्याने शेतकऱ्यांमधे संताप पसरला आहे. या सर्व अटीची पुर्तता केल्यावर ऑनलाईन पंचनामा होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमा कंपन्यांनी विमा भरून घेताना अशा कोणत्याही नियम अटी सांगितल्या नव्हत्या. आज तालुक्यातील सर्वच शेतातील पिके पावसामुळे सडली असून बहूसंख्य शेतकरी अडाणी आहे अँप कसे डाऊनलोड करायचे व सर्व माहीती कशी द्यायची याची माहीती नाही पाण्यामुळे शेतात जाता येत नाही रस्ते नाही. तलाठी 7/12 उताऱ्यावर पिकाची नोंद लवकर करत नाही.अनेक शेतकऱ्यांकडे अँनरॉईड मोबाईल नाही तरी कंपनीने प्रत्यक्ष पाहणी करून पिकाचे पंचनामे करावे सरकारने तातडीने या प्रश्नी लक्ष घालावे व सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी राजेंद्र कार्ले व अँड विजय बोरकर या शेतकऱ्याने केली आहे. यावेळी नानासाहेब बोठे, रघुनाथ बोठे, सुरेश सदाफळ, आनप शिवा सदाफळ, ज्ञानेश्वर गाडेकर, व कृषी अधिकारी गायकवाड यावेळी उपस्थित होते.



























































