महाराष्ट्रात ‘नोटा’ वाढल्या, 7 लाख जणांनी निवडला ‘नकोसा’ पर्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघांत ‘नोटा’ या पर्यायाचा वापरला वाढला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 15 वर्षांच्या कारभाराला कंटाळलेल्या राज्यातील जनतेने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 0.91 टक्के मतदारांनी ‘नोटा’ अर्थात कोणताही उमेदवार पसंत नसल्याचे मत नोंदविले होते, तर 2019 च्या निवडणुकीत 1.35 टक्के मतदारांनी ‘नोटा’ या पर्यायाचा वापर केल्याचे निवडणूक निकालावरून दिसून येत आहे.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 4 लाख 60 हजार 741 मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्याऐवजी ‘नोटा’ हा पर्याय निवडला होता. भाजप सरकारच्या काळात 7 लाख 42 हजार 134 मतदारांनी ‘नोटा’ हा पर्याय यावेळेच्या निवडणुकीत निवडला असून मागील निवडणुकीतील मतदारांच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट आहे. ‘नोटा’ या पर्यायाचे मत ग्राह्य धरण्यात येत नसले तरी निवडणुकीच्या निकालावर त्याचा मोठय़ा प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघात 3064 ‘नोटा’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात 3064 मतदारांनी ‘नोटा’ या पर्यायाचा वापर केला. भाजप प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पुणे जिह्यातील ज्या कोथरूड मतदारसंघातून विजयी झाले त्या ठिकाणी 4023 मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला.

लातूर ग्रामीण, पलूस-कडेगावमध्ये ‘नोटा’ दुसऱया क्रमांकावर
काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा ज्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजयी झाला त्या ठिकाणी ‘नोटा’ या पर्यायाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. धीरज देशमुख यांना 1 लाख 35 हजार मते मिळाली, तर 27 हजार 500 मतदारांनी ‘नोटा’ हा पर्याय निवडला. सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे विश्वजीत कदम यांना 1 लाख 71 हजार 497 मते मिळाली, तर 20 हजार 631 मतदारांनी ‘नोटा’ हा पर्याय वापरला.