
यंदा दिल्लीकरांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. दिवाळी दणक्यात साजरी केली. परंतु फटाक्यांमुळे दिल्लीवर प्रदूषणाची गडद छाया पसरली. दिल्लीकरांची मंगळवारची पहाटच मुळात प्रदूषण घेऊन उगवली. सगळीकडे धुके पसरल्यासारखे दिसत होते, परंतु प्रत्यक्षात ते धुरके होते. दृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नव्हते. दिल्लीत आधीच प्रचंड प्रदूषण आहे. त्यात दिवाळीत तर दिल्लीची हवा आणखीनच खराब झाली. यंदा गेल्या तीन वर्षांतील प्रदूषणाचा उच्चांक मंगळवारी नोंदवला गेला.




























































