
रिलायन्स जिओने नुकतेच IUC च्या नावावर नॉन-जिओच्या कॉलिंगवर आपल्या वापरकर्त्यांकडून पैसे घेणे सुरू केले आहेत. या उलट हिंदुस्थान सरकारची दूरसंचार कंपनी ‘बीएसएनएल’ने आपल्या कंपनीच्या सिम कार्डवरून कॉलिंग केल्यावर ग्राहकांना पैसे देण्याची घोषणा केली आहे.
बीएसएनएलच्या या नवीन ऑफरअंतर्गत 5 मिनिट किंवा या पेक्षा अधिक वेळ कंपनीच्या सिम कार्डवरून कॉलिंग केल्यावर ग्राहकांच्या अकाउंट मध्ये 6 पैसे जोडले जाणार आहेत. बीएसएनएल सध्या तोट्यात सुरू असून कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात देखील करत आहे. याच दरम्यान अनेकवेळा कंपनीच्या विलिनीकरण्याच्या बातम्या देखील आल्या आहेत. मात्र अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही आहे.
बीएसएनएलचे संचालक सीएफए विवेक बन्सल यांनी या संबंधित बोलताना म्हटले आहे की, ‘डिजिटल अनुभवाच्या युगात जिथे ग्राहकांना त्यांचा व्हॉईस आणि डेटासाठी दर्जेदार सेवा हवी आहे, आम्ही आमच्या ग्राहकांना अपग्रेड केलेल्या नेक्स्ट जनरेशन नेटवर्कमध्ये एन्गेज ठेवू इच्छित आहोत. जेणेकरून त्यांना चांगला अनुभव मिळू शकले.’
बीएसएनएलने म्हटले आहे की, ही 6 पैशांची कॅशबॅक ऑफर देशातील सर्व बीएएसएनएल वायरलाइन, एफटीटीएच आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी आहे. बीएसएनएलच्या या नव्या घोषणेने कंपनीचे यूजरबेस वाढेल की नाही, हे आगामी काळातच कळू शकले. परंतु यामुळे जिओ वापरकर्त्यांची नाराजी होऊ शकते. कारण आता वापरकर्त्यांना नॉन-जिओ कॉलिंगसाठी पैसे द्यावे लागतील.
दरम्यान, जिओने आपल्या ग्राहकांना निशुल्क कॉलिंग सेवा देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र व्होडाफोन आणि एअरटेलची गोष्ट वेगळी आहे. या दोन्ही कंपन्यांना IUC आणखी वाढवायची आहे, जेणेकरून गेल्या काही वर्षांपासून दूरसंचार उद्योगात जे नुकसान झाले आहे ते परत मिळवता येईल.

























































