‘परे’च्या या लोकलमध्ये ‘उत्तम’ रेलून बसा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपनगरीय प्रवाशांसाठी नेहमीच काही कल्पक उपाय योजण्यात पुढे असलेल्या पश्चिम रेल्वेने ‘उत्तम’ नावाची नव्या आसनांच्या खुबीसह संपूर्णपणे सीसीटीव्हीची ‘निगराणी’ असलेली लोकल प्रवाशांच्या भेटीला आणली आहे. या लोकलची आसने पाठच्या बाजूला थोडी वाढविण्यात आल्याने प्रवाशांना आता ‘उत्तम’पणे रेलून बसता येणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या बम्बार्डियर लोकलच्या अंतर्गत रचनेत फेरफार करून आरामदायी सुविधा देण्यात आल्या. या लोकलला पश्चिम रेल्वेच्या 69व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी महिला ‘स्पेशल लोकल’ म्हणून प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात आले. प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाहून अशा प्रकारची अंतर्गत रचना करण्यासाठी रेल्वे बोर्डाला विनंती करण्यात येणार आहे.

या नव्या ‘उत्तम’ लोकलचा उद्यापासून ‘परे’च्या ताफ्यात समावेश होणार असला तरी ती वेळापत्रकात नवीन फेरी म्हणून न चालविता आहे त्या फेऱ्यांमध्येच ती सध्या धावणार आहे. तिला ‘महिला स्पेशल’ म्हणून कायम करण्याचे अजून निश्चित नसल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.

महिलांसाठी अत्याधुनिक

‘पॅनिक’ बटण!

या ‘उत्तम’ लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक ‘पॅनिक बटण’ची सोय देण्यात आली आहे. फर्स्टक्लासच्या आसनांना अधिक आरामदायी केले असून निळय़ा रंगाऐवजी त्यांना चॉकलेटी रंग देण्यात आला आहे.

मध्य रेल्वेचीही महिला स्पेशल धावली, पण बुधवारपासून वेळापत्रकातील तिच्या दिवसभरात होणाऱ्या साधारण दहा फेऱ्यांमुळे प्रवाशांना ‘जॅकपॉट’प्रमाणे केव्हाही पकडता येऊ शकणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेचाही 68वा वर्धापन दिन असल्याने त्यांनीही आज ‘परे’च्या पावलावर पाऊल ठेवत ‘महिला स्पेशल’ चालविली; परंतु त्या लोकलमध्ये काही ‘स्पेशल’ नव्हते!

‘बॅक रेस्ट’साठी अधिक उंच आसने

‘उत्तम’ लोकलमध्ये संपूर्णपणे ‘सीसीटीव्ही’चा पहारा असल्याने या लोकलला पुढे ‘महिला स्पेशल’ म्हणून वेळापत्रकात तिचा समावेश करावाच लागणार आहे. या लोकलच्या आसनांची उंची थोडी जादा करण्यात आली आहे. सिलिंगला वुडन फिनिशिंग देण्यात आले आहे. हँडल अधिक सोयीचे देण्यात आल्याने एकावेळी अनेक जण ते पकडू शकतील अशी सोय मिळणार आहे. सामान ठेवण्यासाठीची जागा वाढविण्यात आली आहे. डब्यातील प्रायव्हसी राहील असे इंटेरिअर केले आहे. डब्यात वीज बचत करणारे पंखे व लाइट्स असतील. सेकंड क्लासची आसने फायबर रिन्फोर्स्ड प्लॅस्टिकची आहेत.