
सफाई कामगारांच्या घरांसाठी पालिकेने सुरू केलेल्या ‘आश्रय’ योजनेत मिळणाऱ्या फक्त 160 चौरस फुटांच्या घरात त्यांचा अक्षरशः कोंडमारा होत आहे. त्यामुळे या गोरगरीब सफाई कामगारांना किमान 250 चौरस फुटांचे घर द्यावे अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता सानप यांनी स्थायी समितीत केली.
मुंबई स्वच्छ ठेकणाऱ्या सफाई कामगारांना स्वतःचे घर नसल्यामुळे घनकचरा व्यवस्थापन खात्यात काम करणाऱ्या 28 हजार सफाई कामगारांना हक्काचा निवारा देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गेल्या सात वर्षांमध्ये कुलाबा आणि दादर येथील प्रकल्पाने आकार घेतला आहे. फोर्ट परिसरात कालिकत कोचीन स्ट्रीट येथे 136 पैकी 86 सफाई कर्मचाऱ्यांना आश्रय योजनेअंतर्गत घर देण्यात आले आहे, मात्र आठ मजल्यांच्या इमारतीमध्ये मंजूर करण्यात आलेले घर केवळ 160 चौ.फुटांचे असल्यामुळे कामगारांचा कोंडमारा होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेविका सुजाता सानप यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले. कामगारांच्या कुटुंबातील वाढणाऱ्या सदस्यांच्या संख्येमुळे आणखीनच अडचण होत आहे. त्यामुळे सफाई कामगारांना किमान 250 चौरस फुटांचे घर द्यावे अशी मागणी सानप यांनी केली. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव जाधव यांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवत प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
























































