
उपनगरीय लोकल मार्गावर वातानुकूलित लोकलचा समावेश झाल्यानंतर आपल्या नेहमीच्या लोकलच्या फेऱ्या कमी होत असल्याने मुंबईकरांनी नाक मुरडत या नव्या पाहुणीचे ‘थंडगार’ स्वागत केले होते. ‘परे’ला लागलेली ही ठेच पाहून ‘मरे’ने आता शहाणे होत ठाणे ते वाशी-पनवेल ट्रान्स हार्बरवर एसी लोकलचा समावेश केल्यावर सध्याच्या लोकलचा ‘फर्स्ट क्लास’ जनरल पब्लिकसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेवर 25 डिसेंबर 20 पासून देशातील पहिल्या वातानुकूलित लोकलचा प्रवेश सामान्य प्रवाशांना नाराज करणारा ठरला होता. कारण एसी लोकलचे भाडे फर्स्ट क्लासच्याही तिकिटापेक्षा 1.2 पट जादा असल्याने सामान्य प्रवाशांच्या वेळापत्रकातील 12 फेऱ्या वाया गेल्याची भावना निर्माण झाली होती.
आता मध्य रेल्वेवर एसी लोकल सुरू करण्यापूर्वी ‘ताक’ही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. मध्य रेल्वेने ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-पनवेल या मार्गावर ही एसी लोकल चालविण्याची योजना आखली आहे. ट्रान्स हार्बरवर एकूण 12 लोकलच्या 264 फेऱ्या चालविण्यात येत आहेत. एसी लोकलचा येथे समावेश केल्यास एका साध्या लोकलला प्रवाशांना गमवावे लागेल. तसेच इतर साध्या फेऱ्यांवर त्या लोकलच्या प्रवाशांचा भार सोसावा लागणार आहे. 12 डब्यांच्या एका साध्या लोकलमध्ये फर्स्ट क्लासचे तीन आणि जनरल क्लासचे नऊ डबे असतात. त्यात महिला, अपंग आणि फेरीवाल्यांचे डबेही समाविष्ट असतात. तीन फर्स्ट क्लासच्या डब्यांपैकी एका डब्याला जनरल क्लासचा केल्यास तीनशे प्रवाशांची सोय होणार आहे. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर हार्बर आणि मुख्य मार्गावरही हा प्रयोग करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
मिक्स लोकलची आयडिया
एसी लोकलने साध्या लोकलच्या फेऱ्यांवर गदा येत असल्याने रेल्वे मंत्र्यांनी एसी लोकल अर्धे आणि अर्धे साधे लोकल डबे अशी मिक्स लोकल चालविण्याचाही निर्णय घेतला असून पश्चिम रेल्वेवर तशी एक लोकल दाखल झाली असून तिच्या चाचण्या सुरू आहेत. खरे तर मध्य रेल्वेवर प्रथम वातानुकूलित लोकलचा पहिला प्रयोग होणार होता. मात्र मध्य रेल्वेच्या ब्रिटिशकालीन पुलांच्या अडथळय़ामुळे दाखल झालेल्या एसी लोकलची उंची जादा असल्याने ती पश्चिम रेल्वेला सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे आता मध्य रेल्वेसाठी कमी उंचीची (4270 एमएम) एसी लोकल तयार केली असून ती चेन्नईच्या कारखान्यातून नोव्हेंबर मध्यापर्यंत येणार आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत ट्रान्सहार्बरवर एसी लोकलचा ठंडा-ठंडा कूल कूल प्रवास अनुभवता येणार आहे.



























































