
>>विवेक दिगंबर वैद्य
श्रीस्वामी समर्थ संप्रदायातील प्रसिद्धीपराङ्मुख सत्पुरुष श्रीमयुरानंद सरस्वती यांचा परिचय करून देणारा हा लेख.
दैवगती विलक्षण न्यारी असते, ती कुणाच्या बाबतीत काय निर्णय घेईल हे केवळ विधाताच जाणतो अन्य कुणीही नाही. ज्या जोशी घराण्यात ज्योतिष आणि वैद्यकी परंपरेने चालत आली होती त्या घराण्यातील मोरेश्वर रघुनाथ जोशी यांनी त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला गायन-वादनकलेची जोड दिली अन् मस्तकावर कीर्तनकाराची पगडी चढवून पुढे कीर्तन परंपरेची गादी स्थापन केली. पुढे मोरेश्वर जोशी या व्युत्पन्न, बहुआयामी गृहस्थाला श्रीस्वामी समर्थांचा सहवास लाभला आणि ते ‘मयुरानंद सरस्वती’ नावाने ‘यातकीर्त’ झाले.
‘मयुरानंद सरस्वती’ यांच्या अवतारकार्याचा प्रवास विलक्षण आणि जनसामान्यांस थक्क व अचंबित करणारा असा आहे. अक्कलकोट येथे श्रीस्वामींची भेट घडल्यावर त्यांच्याकडून मयुरानंदांना पितळी पादुका, श्रीगणेशमूर्ती आणि दगडावर कोरलेल्या पादुका प्राप्त झाल्या. ‘जा सोपाऱयाला. आमची ध्वजा उभी कर.’ या श्रीस्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार मयुरानंद त्यांना लाभलेला ‘स्वामीप्रसाद’ सोबत घेऊन नालासोपारा येथील त्यांच्या मूळ गावी, ‘उमराळे’ येथे परतले आणि येथेच त्यांनी श्रीराम मंदिराची स्थापना केली.
श्रीमयुरानंद सरस्वती हे पूर्वाश्रमीचे मोरेश्वर रघुनाथ जोशी, संभाजीनगर नजीकच्या घनसांगवी गावातील या जोशी घराण्याला दुष्काळामुळे स्थलांतरित व्हावे लागले. या घराण्याचे ज्ञात मूळ पुरुष नारायणभट भास्करे जोशी वेदशास्त्र संपन्न होते. अध्यात्मासोबतच जोशी घराण्यात ज्योतिष आणि वैद्यकीही परंपरेने चालत आली. पेशव्यांनी ‘भास्करे’ आडनावाऐवजी ‘जोशी’ आडनाव लावावे असे सुचविल्याने भास्करे घराण्याची ओळख पुढे ‘जोशी’ उपनावाने रुढ झाली. या घराण्यातील धोंडूबुवा यांना वयाच्या उत्तरार्धात पुत्रप्राप्ती झाली. नवजात बालकाचे नाव रघुनाथ ठेवण्यात आले. रघुनाथाचा विवाह उमराळे गावानजीकच्या नाळे गावातील वेदशास्त्र संपन्न लक्ष्मणशास्त्राr गोविंद जोशी यांच्या बहिणीशी झाला. या उभयतांस पहिली मुलगी झाली व त्यानंतर मुलगा झाला. हेच बाळरूप पुढे ‘मोरेश्वर’ हे नाव धारण करते झाले.
ज्येष्ठ वद्य नवमी, शके 1759 (सन 1838) मध्ये मोरेश्वर यांचा जन्म झाला. मामा लक्ष्मणशास्त्राr जोशी यांनी ग्रहमानानुसार ‘हे बाळ विलक्षण आहे मात्र त्यास मात्यापित्याचे सुख नाही’ असे अनुमान काढले. बाळ जन्मल्यानंतर सहाव्याच दिवशी त्याची बहीण वारली, बाराव्या दिवशी वडील निवर्तले आणि बाळाच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्याची आईही देवाघरी गेली. लहानग्या मोरेश्वराची जबाबदारी मामाने स्वीकारली. संस्कृत व ज्योतिषशास्त्राचे बाळकडू मोरेश्वराला आजोळीच मिळाले. काही काळानंतर मोरेश्वराचे चुलत आजोबा वेदशास्त्र संपन्न बापू जोशी यांनी त्यास नाळे येथून उमराळे गावास आणले. बापू जोशींना मोरेश्वराचा अतिशय लळा होता. उमराळे येथील चक्रश्वर मंदिरात आलेल्या एका सत्पुरुषाने दर्शनाथमध्ये असलेल्या मोरेश्वराकडे पाहात सांगितले की, ‘मातृपितृसुखाला पूर्णतः अंतरलेला हा बालक मोठेपणी विद्वान, बहुगुणी आणि ज्ञानयोगी म्हणून मान्यता पावेल अन् घराण्याची कीर्ती वाढवेल’. तेव्हा मोरेश्वर अडीच वर्षांचा होता.
त्या काळच्या चालीरीतींप्रमाणे, मोरेश्वरांचा बालविवाह पालघर तालुक्यातील एडवन गावचे राजवैद्य बाबाजी घनश्याम पुरोहित यांची कन्या गोपिकाबाई हिच्याशी झाला. प्रपंचकार्ये नेमाने होऊ लागली. उमराळ्याच्या चक्रश्वर महादेवाची पूजाअर्चा आणि श्रीमदभगवद्तेचे नित्य पारायण घडत होते. या नित्यनेमासोबत मोरेश्वर यांनी स्वतःस गायकीची आवड जडवून घेतली. ग्वाल्हेर घराण्याची परंपरा असलेले बाळाबुवा गोसावी हे उत्तम गायक वसई येथे राहत होते. मोरेश्वरांमधील उपजत नम्रता आणि कष्ट करण्याची तयारी पाहून बाळाबुवांनी त्यास गंडाबंद शागीर्द केले. मोरेश्वरांनी शास्त्राrय संगीत आत्मसात केले. वादनकलेमध्येही त्यांनी लक्षणीय प्रगती केली.
सोपारा परिसरातील मित्रांच्या आग्रहास्तव मोरेश्वरांनी गाण्याचे कार्यक्रम करण्यास प्रारंभ केला. सोबत अभिनयाचीही आवड असल्याने ते नटाची सोंगेही वठवू लागले. मुसलमान फकिराचे सोंग ते हुबेहूब वठवीत आणि कुराणामधील असंख्य वचने लीलया बोलून दाखवीत असत. मोरेश्वरांसारखा हिंदू ब्राह्मण आपल्या धर्मवचनांचा अस्खलित उच्चार करतो हे पाहून मुसलमान मंडळी खूश होत व भरपूर बक्षिसी देत (त्याकाळी मोरेश्वरांना चाळीस-पन्नास रुपयांपर्यंत बक्षिसी मिळत असे.) मात्र पुढे मोरेश्वरांच्या या वागण्याची चर्चा होऊ लागली तशी कुजबूजही वाढली आणि एके दिवशी ही गोष्ट त्यांचे गुरू बाळाबुवा गोसावी आणि मामा लक्ष्मणशास्त्राr जोशी यांच्यापर्यंत पोचली.
बाळाबुवांनी मोरेश्वराला स्पष्ट शब्दात जाब विचारला, ‘गायन व संवादफेक यात तुझी प्रगती झाली असली तरीही हे असे किती दिवस चालणार! यामुळे शाश्वत सुखसौख्याची प्राप्ती होईल काय?’ हे आणि असे अनेक प्रश्न विचारून त्यांनी मोरेश्वरांची चांगलीच कानउघाडणी केली. पश्चात्तापदग्ध मोरेश्वरांना त्यांच्या हातून घडलेल्या कृतीविषयी दुःख झाले. त्यांनी तिथल्या तिथे शपथ घेतली की, ‘यापुढे लळीत करणार नाही आणि सोंगेही वठवणार नाही.’ या एका प्रसंगामुळे मोरेश्वरांचे आयुष्य आमूलाग’ बदलले. त्यांना विरक्ती खुणावू लागली आणि सोबत सद्गुरूदर्शनाची ओढही लागली. कुणास शरण जावे? काहीच कळेना. सर्वत्र, सर्वांना विचारून पाहिले तेव्हा अनेकांच्या मुखातून त्यांना ‘अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थ महाराजांकडे जावे’ हे एकच उत्तर ऐकावयास मिळाले. त्यामुळे श्रीस्वामी समर्थांना भेटण्याची अपार तळमळ मोरेश्वरांना कासावीस करती झाली. सद्गुरूदर्शनासाठी ते तळमळू लागले. दरम्यान श्रीस्वामी महाराजांनी स्वप्न दृष्टांताद्वारे दर्शनही दिल्यामुळे मोरेश्वरांची तगमग अधिकच वाढती झाली. अखेर त्यांनी पत्नीकडे आपल्या मनोवस्थेची कबुली दिली आणि श्रीस्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे जाण्याची परवानगी तिच्याकडून मिळवली. अशा रीतीने मोरेश्वरपंत अक्कलकोटास जाण्याकरिता निघाले.
मोरेश्वर अक्कलकोट येथे आले तेव्हा त्यांना श्रीस्वामी तिथून दूर एका टेकडीवर असल्याची माहिती मिळाली. मोरेश्वर तिथे जाण्यास निघाले तेव्हा इथे श्रीस्वामी त्यांच्या सेवेकऱयांना ‘किती हा वेडा. सोपाऱयाहून अन्नपाणी सोडून माझ्या भेटीसाठी येतो आहे.’ असे सांगत होते, मात्र त्यांच्या बोलण्याचा अर्थ कुणालाही कळला नाही. मोरेश्वर तिथवर पोहोचले तेव्हा श्रीस्वामी आनंदाने ‘आला रे आला’ असे म्हणू लागले. स्वप्नदृष्टांतात पाहिलेले रूप साक्षात समोर पाहून मोरेश्वर सद्गदित झाले तोच श्रीस्वामी त्यांना म्हणाले, ‘अरे, इतका त्रास घेऊन का आलास? मी तुला भेटण्यासाठी आलो होतो ना! आता लागलीच घरी जा. तुझी पत्नी अन्नपाणी वर्ज्य करून देवापुढे बसली आहे. तू गेल्याशिवाय ती काही खाणार नाही. ताबडतोब निघ.’ दयाळू स्वामीरायांचे हे अंतःसाक्षीत्व पाहून मोरेश्वर आश्चर्यचकित झाले. (पूर्वार्ध)



























































