
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या (जेएनयू) प्रशासनाने बुधवारी फीवाढ मागे घेऊनही विद्यार्थ्यांनी गुरुवारी पुन्हा आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय भवनात घुसून घोषणाबाजी केली. स्वामी विवेकानंदांच्या मूर्तींची विटंबना करून भाजपविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिला.
जेएनयूच्या प्रशासनाने हॉटेल फीवाढ पूर्णपणे मागे घ्यावी अशी मागणी करीत विद्यार्थ्यांनी गुरुवारी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली. जेएनयू प्रशासनाचा बुधवारचा निर्णय म्हणजे केवळ धूळफेक आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
भिंतींवर आक्षेपार्ह मजकूर
फीवाढीविरोधात संतापलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी कुलगुरू एम. जगदीश कुमार यांच्या कार्यालयाला टार्गेट केले. प्रशासकीय भवनाच्या तिन्ही माळ्यांवरील भिंती आणि दरवाजांवर आंदोलनकर्त्यांनी आक्षेपार्ह मजकूर लिहिला. हा मजकूर कोणी लिहिला हे अजून उघड झालेले नाही, मात्र याची छायाचित्रे सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली आहेत.

























































