
तामीळनाडूत 2021 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडेल असा विश्वास सुपरस्टार रजनीकांत यांनी व्यक्त केला. येत्या काही महिन्यांत नवीन पक्षाची घोषणा केली जाण्याचे संकेत रजनीकांत यांनी दिले आहेत.
अण्णा द्रमुकच्या अध्यक्षा जयललिता आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी या दोन्ही नेत्यांच्या मृत्यूमुळे तामीळनाडूच्या राजकारणात सध्या पोकळी निर्माण झाली आहे. 2021 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीत तामीळनाडूचे नेतृत्व रजनीकांत यांनी करावे अशी चर्चा जनतेमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच रजनीकांत यांनी प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांच्या पक्षाबरोबर आघाडी करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे रजनीकांत लवकरच नवीन पक्षाची घोषणा करतील अशी शक्यता आहे.
मुख्यमंत्री कोण हे नंतर ठरवू!
गोवा येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रजनीकांत यांचा सन्मान करण्यात आला. गोव्याहून ते परतल्यानंतर चेन्नई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडेल असे वक्तव्य केले. मुख्यमंत्रीपदाबाबत ते म्हणाले, मला आधी राजकीय पक्ष स्थापन करून कार्यकर्त्यांशी बोलावे लागेल. त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करू.

























































