
दिल्लीतील वायुप्रदूषणाच्या निमित्ताने शुक्रवारी लोकसभेत एकंदरीतच प्रदूषणाच्या समस्येवर चांगलीच चर्चा झाली. या चर्चेवेळी हस्तक्षेप करताना लोकसभा अध्यक्ष ओम् बिर्ला यांनी सिंगल यूज प्लॅस्टिकवर देशभरात बंदीच हवी अशी स्पष्ट भूमिका मांडली. या सभागृहात देशाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आहेत. 130 कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून आपण सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी हवीच असे मनोमन ठरवायला हवे, असेही बिर्ला यावेळी म्हणाले.
लोकसभेतील चर्चेत मनेका गांधी यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडत प्रदूषणाच्या बाबतीत गंभीरपणे धोरण आखण्याची गरज बोलून दाखविली तर काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी वायुप्रदूषण व प्लॅस्टिकच्या समस्येबाबत चीन आणि अमेरिकेने केलेल्या प्रयत्नांचा दाखला देत आपल्या देशातही असेच स्वतंत्र धोरण राबविण्याची गरज असल्याचे सांगितले. चर्चेला उत्तर देताना केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशभरात दररोज 25 हजार टन प्लॅस्टिक कचरा गोळा होतो. त्यापैकी 40 टक्के कचरा एकत्रित करता येत नसल्याने त्याचे विघटन होत नसल्यामुळे परिस्थिती गंभीर होत असल्याचे नमूद केले. यंदाची दिवाळी फटाकेमुक्त करण्याचे आवाहन दिल्लीकरांना केले होते. त्याचे चांगले परिणाम दिसून आले.
ई-सिगारेटविरोधी विधेयक लोकसभेत
ई-सिगारेटच्या विक्रीला प्रतिबंध करणारे विधेयक शुक्रवारी लोकसभेत मांडण्यात आले. या विधेयकावर आवश्यकता भासल्यास पुढील आठवडय़ात चर्चा होण्याची शक्यता आहे.
दिल्ली प्रदूषणावरून खडाजंगी
दिल्लीच्या वायुप्रदूषणाच्या मुद्दय़ावरून राज्यसभेतले वातावरण चांगलेच तापले. भाजप आणि आम आदमी पक्षाच्या खासदारांमध्ये या मुद्दय़ावरून ब्लेम गेम सुरू झाला. याचवेळी ‘आप’चे संजय सिंग यांची जीभ घसरल्यामुळे सभापती व्यंकय्या नायडू प्रचंड संतप्त झाले. सभापतींनी संजय सिंग यांना कडक शब्दांत समज दिली. इलेक्टोरेल फंडाविरुद्धही विरोधकांनी आजही राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी केली.

























































