हरिनामाचा जप, टाळमृदंगाच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यातील भागवत एकादशी शनिवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत अलकांपुरीत साजरी होत आहे. वारकऱयांच्या सोयीसुविधांसाठी आणि सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनासह आळंदी देवस्थानच्या वतीने चोख उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सोहळा काळात वारकऱयांसह नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांनी दिली.

‘ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर या भावनेने माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यातील भागवत एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल होत आहेत. हरिनामाचा जप, भजन, कीर्तन आणि टाळ मृदंगाच्या गजराने अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. उद्या माऊलींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा होत आहे. दरम्यान दशमीदिनी शुक्रवारी पहाटे माऊलींना अभिषेक, दुधारती, भाविकांच्या महापूजा, महानैवेद्य आदी विधी झाले. त्यानंतर विणामंडपात कीर्तन सेवा, धुपारती, नंतर पुन्हा कीर्तनसेवा झाली. दरम्यान, पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या पादुकांची पालखी आळंदीत दाखल झाली. ग्रामप्रदक्षिणेनंतर इंद्रायणी नदीवर विठ्ठलाच्या पादुकांना इंद्रायणीस्नान झाले. यावेळी वारकऱयांनी दर्शन व महापूजेस मोठी गर्दी केली.