महावितरण वीजजोडणी तोडणार, जिल्ह्यात 64 कोटींची बिल थकबाकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरगुती आणि औद्योगिक वर्गवारीतील नगर जिल्ह्यातील 5 लाख 9 हजार ग्राहक महावितरणच्या रडारवर आले आहेत. या ग्राहकांकडे 64 कोटी 88 लाखांची वीजबिल थकबाकी असल्याने वसुलीसाठी वीजपुरवठा तोडण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. दरम्यान, वीज तोडल्यावर संबंधितांनी पैसे भरले तरी त्यांच्याकडून पुनर्जोडणी शुल्क वसूल केले जाणार आहे. किमान एक वा दोन दिवसांनी वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत वीज देयकांचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर व ई-मेलवर वीजपुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविली जात आहे. या नोटिसचा विहीत कालावधी संपताच ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. ज्या नोटिसांचा कालावधी संपल्यावर तेथील वीजपुरवठा तोडला जात आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे, त्या ग्राहकांना पुन्हा वीजपुरवठा सुरळीत करून घ्यायचा असेल, तर त्यांना नियमानुसार एकूण थकबाकीसह पुनर्जोडणी शुल्क भरावे लागणार आहे. शिवाय शुल्क भरल्यानंतर पुनर्जोडणी करण्यासाठी प्रादेशिक भागानुसार 24 तास ते 48 तासांपर्यंतचा अवधी लागू शकतो, असे महावितरणने सांगितले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित ग्राहकाने वीज देयकाच्या थकबाकीची रक्कम व पुनर्जोडणी शुल्क (जीएसटीसह) रुपये 118 (सिंगल फेज घरगुती ग्राहक) भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याबाबतची कार्यवाही केली जाणार आहे, असेही सांगण्यात आले. वीजपुरवठा तोडला होणारी गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी थकबाकीदारांनी वीज देयकांचा भरणा वेळेत करण्याचे आवाहन नगर मंडलाच्या वतीने करण्यात आले आहे.

नगर मंडलामध्ये घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक थकबाकी

  •  नगर ग्रामीण विभाग – 71 हजार 459 ग्राहकांकडे 7 कोटी 64 लाख.
  •  नगर शहर विभाग – 1 लाख 45 हजार 898 ग्राहकांकडे 21 कोटी 36 लाख.
  •  कर्जत विभाग – 46 हजार 566 ग्राहकांकडे 6 कोटी 41 लाख.
  •  संगमनेर विभाग – 1 लाख 45 हजार 618 ग्राहकांकडे 17 कोटी 57 लाख.
  •  श्रीरामपूर विभाग – 99 हजार 962 ग्राहकांकडे 11 कोटी 9 लाख.
  •  नगर मंडल एकूण – 5 लाख 9 हजार 503 ग्राहकांकडे 64 कोटी 88 लाख.