बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची अंतराळ संस्था इस्त्रोने इतिहास रचला असून गुरुवारी सकाळी 9.28 मिनिटांनी ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधील दुसऱ्या लॉंच पैडमधून कार्टोसॅट-3 चे प्रक्षेपण करण्यात आले. कार्टोसैट-3 पृथ्वीपासून 509  किलोमीटर उंचावर फिरत असून अवकाशात तो पाच वर्षे राहणार आहे. कार्टोसॅट-3 उपग्रहामध्ये हाय रिसॉल्युशनची छायाचित्रे घेण्याची क्षमता आहे.

देशाच्या सुरक्षेबरोबरच विकासासाठी कार्टोसॅट-3 चे प्रक्षेपण महत्वाचे आहे. कारण या उपग्रहामुळे पाकिस्तानच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवणे हिंदुस्थानी लष्कराला शक्य होणार आहे. एवढेच नव्हे तर गरज पडल्यास या उपग्रहाच्या मदतीने शत्रू राष्ट्रांवर सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक करणेही शक्य होणार आहे.

कार्टोसॅट-3च्या प्रक्षेपणानंतर आपल्याला खूप आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया इस्त्रोचे प्रमुख डॉक्टर के सिवन यांनी दिली आहे. तसेच पीएसएलवी-सी 47 ने कार्टोसैट-3 आणि अमेरिकेतील 13 लघु उपग्रहांचेही यशस्वी प्रक्षेपण करण्यात आल्याचे म्हटले आहे. यासाठी संपूर्ण टीमचे त्यांनी अभिनंदन केले आहे. पीएसएलवीचे हे 74 वे उड्डाण असून अमेरिकेचे इतर 13 नॅनो उपग्रह देखील आकाशात सोडले गेले आहेत. ह्या उपग्रहांचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जाणार आहे. यातील कॅमेरा 509 किलोमीटर उंचावरुन जमिनीवर 9.84 उंचावरील दृश्य टीपले जाणार आहेत.

पाकड्यांवर ठेवणार नजर
कार्टोसैट-3 चा मुख्य उपयोग हा देशातील सीमांवर निगराणी करण्यासाठी आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीतही कार्टोसैट-3 चा उपयोग होणार आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कार्टोसैट-3 चा मोठा उपयोग होणार आहे.