
30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर रोजी विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. उद्या पहिल्या दिवशी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. दुपारी दोन वाजता सत्ताधारी पक्षातर्फे विश्वासदर्शक ठराव आणला जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरील विश्वासदर्शक ठराव शिवसेनेचे विधानसभा मुख्य प्रतोद सुनील प्रभू, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक हे मांडतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार बहुमत सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यापूर्वी राज्यपालांनी हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेल्या सदस्याची घोषणा होईल. या वेळी नवनियुक्त मंत्र्यांचा परिचय करून दिला जाईल.
अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अभिभाषण होईल. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव ठेवला जाईल. त्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांच्या नियुक्तीची घोषणा केली जाईल.
दिलीप वळसे-पाटील हंगामी विधानसभाध्यक्ष
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला. राज्यपालांनी वळसे-पाटील यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. वळसे-पाटील यांनी 2009 ते 2014 पर्यंत विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती.























































