सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांचे संवर्धन व्हावे, शिवप्रेमींची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, शिवस्मारके यांची देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छता कायम स्वरूपी व्हावी यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवप्रेमींनी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराजांनी अथक परिश्रमातून सुंदर असं स्वराज्य स्थापन केलं. पण त्यांनी त्यांच्या स्वराज्यामधील जनतेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला नाही. म्हणून महाराजांना लोककल्याणकारी जाणता राजा असेही संबोधले जाते. परंतु आज पूर्ण महाराष्ट्राची जी दशा आहे, विशेष करून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराजांचे गडकिल्ले यांची झालेली दुर्दशा. महाराजांचे ,राजमाता जिजाऊ तसेच थोर पुरुष यांचे पुतळे आज त्यांची झालेली दुर्दशा, तसेच शाळा, महाविद्यालये, विविधनगर यांना आजही महाराजांचा एकेरी नावाने ‘शिवाजी’ असे संबोधले जाते या पेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकत नाही असे या शिवप्रेमींचे म्हणणे आहे.

त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गड़किल्ले, शिवस्मारके यांची देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले असून यावेळी स्वरूप वाळके, अनंतराज पाटकर, रमाकांत नाईक, गणेश कारेकार, विकल्प ठाकुर, अनूप जाधव, सुशिल सावंत, प्रथमेश धुरी आदि शिवप्रेमी उपस्थिय होते.

या आहेत प्रमुख मागण्या
छत्रपती शिवाजी महारांच्या गड़किल्ल्यांची देखभाल दुरुस्ती व्हावी, स्वच्छ्ता करण्यात यावी, ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या आणि तेथील उद्यानाची दुरुस्ती व्हावी, जिल्ह्यात अन्यत्र असलेल्या शिव स्मारकांची स्वच्छता करण्यात यावी, शाळा महाविद्यालय आणि नगरे यांना महाराजांचे एकरी नावाचा असलेला उल्लेख त्यात बदल करून छत्रपती शिवाजी महाराज असे करण्यात यावे

अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू
शिवप्रेमींनी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील काही विषयांवर आणि काही मागण्यां चे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे. प्रशासनाने आपल्या मागण्या वर सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.