
अडीच हजार वर्षापूर्वी हिंदुस्थानला ‘सोन्याची चिमणी’ म्हटले जायचे. तशा प्रकारचा विकास आणि समृद्धी आणण्यासाठी आमचे विद्यार्थी प्रयत्न करतील. तसा संकल्पच त्यांनी करावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 36 वा दीक्षांत समारंभात ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते. केंद्र सरकारच्या मनपष्यबळ विकास, दूरसंचार, ईलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री संजय धोत्रे कार्यक्रमाला उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राज्यपाल म्हणाले की, संत गाडगेबाबांचे नाव असलेल्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात मुलांपेक्षा मुलींनी सगळ्यात जास्त पारितोषिक मिळवली आहेत. आपल्या पूर्वजांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष केला, बलिदान दिले. प्रत्येकाने देशाबाबत मातेसमान आदर ठेवावा. आपल्या देशाचा विकास झपाट्याने होत असून जगात आपला दबदबा निर्माण होत आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी, उच्च शिक्षण पूर्ण करून, तुम्ही आता जीवनाच्या विविध क्षेत्रांत मार्गक्रमण करणार आहात. तेव्हा संत गाडगेबाबांच्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि मानवतावादी मूल्यांचा अंगीकार करून तुम्ही वाटचाल करावी, असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. दीक्षांत समारंभामध्ये 40 हजार 635 पदवीकांक्षींना व 72 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आल्या. यासह मानव विज्ञान विद्याशाखा – 17 हजार 668, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा – 8 हजार 39, विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा – 11हजार 277 आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा – 3 हजार723 विद्यार्थ्यांनी पदवी/पदविका प्राप्त केल्या. यावेळी विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.























































