कलायोगी अवलिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. गजानन सीताराम शेपाळ

सव्यसाची चित्रकार गोविंद माधव सोलेगावकर उर्फ ‘गोमा’ हे प्रसिद्धीपेक्षा परिणामकारक चित्रनिर्मितीला प्राधान्य देणारे प्रयोगशील चित्रकार होते. केवळ चित्रनिर्मितीकडेच त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले. त्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात राहिले नाहीत, पण चित्रसिद्धी आणि रंगसाधनेची उपासना यामुळे ते ‘कला अवलिया’ मात्र निश्चितच बनले.

जे. जे. स्कूलचे माजी डीन मिस्टर ग्लॅडस्टोन सॉलोमन यांच्या अत्यंत आवडत्या विद्यार्थ्यांमध्ये गोविंद माधव सोलेगावकर यांचा नंबर वरचाच. मुंबईतील समर्थ कला सोसायट्यांच्या प्रदर्शनात त्याकाळी सोलेगावकरांच्या कलाकृती ‘आयकॉन’ ठरायच्या. त्यांच्या कलाकृतींनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांतून पारितोषिके, मेडल्स, ट्रॉफीज आणि सन्मानपत्रांसह बहुमान प्राप्त केला. पण या सिद्धहस्त ज्येष्ठ-श्रेष्ठ चित्रकाराचं नाव इतर समकालीन चित्रकारांच्या तुलनेने फारसं प्रसिद्ध झालेलं दिसत नाही. ते प्रसिद्धीपेक्षा परिणामकारक चित्रनिर्मितीला प्राधान्य देणारे प्रयोगशील चित्रकार असल्यामुळेच केवळ चित्रनिर्मितीकडेच त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले. त्यामुळे ते भलेही प्रसिद्धीच्या झोतात राहिले नसतील, पण चित्रसिद्धीमुळे आणि रंगसाधनेच्या उपासनेमुळे ते ‘कला अवलिया’ मात्र निश्चितच बनले. एकदा घरी मातोश्रींना सांगितले (म्हणजे गौरी आणि कृष्णा यांच्या आईला) की, ‘‘मी जरा युरोप-यूकेत जाऊन येतो’’ हे त्यांचं सांगणं इतकं सहज होतं की, आपण कुठे तरी दादरला वा ठाण्याला जाऊन येतो असं सांगण्यासारखं. खिशात पुरेसा पैसा नव्हता, परंतु ‘गोमा’ युरोपात गेले. एक वा दोन दिवस नव्हे तर तब्बल दोन वर्षे ते तिकडे राहिले. कुठे राहिले? कसे राहिले? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. मात्र युरोपियन कलारसिकांना वेडं करून दोन वर्षांनी ते मुंबईत आले. युरोपात त्यांनी असंख्य चित्रे दिली. त्यांच्या चित्रांवर ते स्वतःचं नाव लिहीत नसायचे. ‘‘मी केवळ समोर दिसतं ते कागदावर उमटवतो आहे. वास्तविक ही निर्मिती ईश्वराचीच आहे. मी माझं नाव कसं लिहू?’’ इतका नितळ विचार आज ऐकायलासुद्धा मिळणं दुरापास्त आहे. म्हणूनच त्यांच्या असंख्य चित्रांवर स्वाक्षरी नाही. मध्यंतरी एका ‘व्यापारी’ कलाकाराने त्यांच्या कलाकृतींचा दुरुपयोगही केला होता, ‘गोमा’ यांची कलाशैली म्हणजे स्वप्नमयसृष्टीचे दर्शन होय.

रंगरचनेतील सौंदर्याविष्कार हा व्यक्तिचित्रणांमध्ये जसा दिसतो तद्वतच भित्तिचित्रांमध्येही. त्यातील भव्यतेसह सौंदर्याभिरूची पाहताना कलारसिक थक्क व्हायचे. 1935 मध्ये त्यांच्या ‘महियारी’ या चित्राला सुवर्णपदक मिळाले होते. त्यांना मुंबईचे पहिले हिंदुस्थानी ‘आधुनिक चित्रकार’ अशी ओळख याच काळात लाभली. त्यांच्या कलेतून नेहमी येणारा भव्यतेचा प्रत्यय हे त्यांच्या कलेचे एक मोठे वैशिष्टय़ ठरावे असं ब. र. आंबेरकर यांनी एका लेखात लिहिलेलं आहे ते अगदीच अचूक आहे. कारण त्यांची भित्तिचित्रे (म्युरल्स) ही सूचकतेचे विलक्षण सामर्थ्य असलेली रंगयोजना आणि यथायोग्य रचना यांचा विलोभनीय संगम असायची. म्हणून त्यांना ‘म्युरल पेंटर’ म्हणूनही मोठी ओळख मिळाली. त्यांचे रंगलेपन कौशल्य हे विविधांगी असायचे. कधी सपाट रंगलेपन तर कुठे पोत असलेले, उठाव असलेले रंगलेपन. त्यामुळे त्यांची प्रत्येक कलाकृती ही अजरामर ठरली. ‘फ्लाइंग हाय’, ‘सायमल्टेनिटी’, ‘रिफ्लेक्टेड’, ‘जोग फॉल्स’, ‘कन्हैया’ या कलाकृती, आकाररचना आणि श्रीमंत रंगयोजना यामुळे श्रेष्ठ ठरल्या. त्यांनी पारंपारिकतेबरोबरच आधुनिक कलाप्रवाहातही नीरस विषयांनाही ताजेतवाने करून चैतन्यदायी कलाकृती निर्माण केल्या. ‘टॉप्स’, ‘ऍप्रोचिंग बोट’ या कलाकृती पाहताना आपणास वरील विधानाची प्रचीती येते. 1912 ला भोपाळजवळील सिहोर या गावी जन्मलेल्या आणि इंदूरनंतर मुंबईच्या जे. जे. स्कूलमध्ये कला पदविका धारण केलेल्या सोलेगावकरांनी आधुनिक चित्रशैलीतील प्रयोगशील चित्रकार म्हणून मोठी ओळख मिळविली. त्यांनी अजिंठा लेणी येथील भित्तिचित्रांवर सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी तिकडेच मुक्काम हलवला आणि क्रतस्थ कलाजीवनाला सुरुवात केली. हिंदुस्थानी कलापरंपरांचं पुनर्निर्माण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. आध्यात्मिकतेला चित्ररंगांची जोड देत हिंदुस्थानी संस्कृतीला आधुनिक कलाप्रवाहाबरोबर आणण्यासाठी अनेक प्रयोग करीत करीत या कलायोगी अवलियाने 1986 साली जीवनयात्रा संपविली. ते आता आपल्यात नसले तरी त्यांचे नैसर्गिक रंगनिर्मितीसह रंगलेपन आजही जिवंतपणाची अनुभूती देतात.

सव्यसाची चित्रकार गोविंद माधव सोलेगावकर यांच्या कलाजीवनाचा रंगरेखापट 20 डिसेंबर 2019 ते 5 जानेवारी 2020 या द्विसप्ताहात मुंबईच्या नेहरू सेंटर कलादालनात विनामूल्य पाहायला मिळत आहे. कला हेच ‘जीवन’ म्हणून आयुष्य झोकून देणाऱया या श्रेष्ठ कलावंताच्या दुर्मिळ कलाकृती त्यांची कन्या गौरी क्षीरसागर यांनी आयुष्याची ठेव म्हणून जतन करून ठेवल्या आहेत. त्यांचे बंधू श्रीकृष्ण सोलेगावकर यांनीही ‘गोमां’च्या कलाकृती सांभाळल्या आहेत. त्या साऱयांचं दर्शन कलारसिकांना व्हावे यासाठी नेहरू सेंटरच्या गॅलरी व्यवस्थापिका नीना रेगे यांनी पुढाकार घेऊन ही पर्वणी कलारसिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

[email protected]