
हिंदुस्थानात अमली पदार्थ किंवा अन्य स्वरूपाच्या गुन्हेगारीच्या कारणामुळे शिक्षा भोगलेल्या परदेशी नागरिकांसाठी डिटेंशन कॅम्प उभारले जातात. अशा डिटेंशन कॅम्पबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. मात्र नागरिकत्व सुधारणा कायदा आणि ‘एनआरसी’नुसार राज्यात एकही डिटेंशन कॅम्प होणार नाही. तेव्हा नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गैरसमज मनात बाळगू नयेत. राज्याच्या कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाला दिली.
राज्यातील तसेच मुंबईतील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सहय़ाद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाला आश्वस्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले, राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजन्स-एनआरसी) निर्णय झालेला नाही याची खात्री केली आहे. असा कायदा फक्त अमली पदार्थ किंवा अन्य स्वरूपाच्या गुन्हेगारीच्या कारणामुळे शिक्षा भोगलेल्या परदेशी नागरिकांसाठीच लागू केला जातो. या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठविण्यासाठीची कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर मायदेशात परत पाठविण्यापर्यंत जो कालावधी लागतो त्यादरम्यानच्या कालावधीत तेथे ठेवण्यात येते. असा कोणताही कॅम्प राज्यात उभा राहणार नाही. त्यामुळे डिटेंशन कॅम्पबाबत गैरसमज करून भीती बाळगू नये. राज्यात शांततेचे वातावरण ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार अमीन पटेल, अब्दुल सत्तार, अबू आझमी, माजी मंत्री नवाब मलिक, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे , मुस्लिम समाजाचे धर्मगुरू उपस्थित होते.
राज्याच्या लौकिकाला धक्का लागू देऊ नका!
देशभरात या कायद्याविरोधात आंदोलने होत असून आंदोलनादरम्यान काही ठिकाणी हिंसाचार होत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पण अशा वेळी आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राची शांततेची परंपरा जपत राज्याच्या लौकिकास धक्का लागू नये यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. कोणाचाही हक्क हिरावला जाणार नाही. यासाठी शासन खंबीरपणे जनतेच्या पाठीशी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया!
महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे हे राज्य आहे. नव्या पिढीला योग्य दिशा देण्याची जबाबदारी आपली सर्वांनी आहे. युककांमध्ये बेरोजगारीच्या कारणाने असंतोष निर्माण होतो. अशावेळी त्यांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी हिंदुस्थानला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वानी मिळून प्रयत्न करूया, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


























































