
अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प असलेली माथेरानच्या मिनी ट्रेनची अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा आठवडाभरात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी उद्या बुधवारी रिकाम्या डब्यांद्वारे चाचणी घेतली जाणार आहे.
मिनी ट्रेनच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. माथेरानमध्ये वरच्या बाजूला देखभालीसाठी लोकोशेड उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जानेवारीअखेर संपूर्ण नेरळ-माथेरान मार्गावर मिनी ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, अमन लॉज ते माथेरान दरम्यान मिनी ट्रेनची रिकाम्या डब्यांद्वारे उद्या बुधवार, 25 डिसेंबरला चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर माथेरान-अमन लॉज या मार्गावरील शटल सेवा सुरू करण्यात येणार आहे. यंदा झालेल्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरानदरम्यानचा रेल्वे मार्ग 22 ठिकाणी नादुरुस्त झाल्यामुळे मिनी ट्रेनची सेवा बंद करण्यात आली आहे.
मिनी ट्रेनची घसरगुंडी
जानेवारी ते मे 2016 दरम्यान मिनी ट्रेनचे डबे घसरण्याचे लागोपाठ अपघात घडले होते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मिनी ट्रेन मे 2016 सालापासून बंद करण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने नेरळ ते माथेरान मार्गाचा सुरक्षा अहवाल तयार करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मध्य रेल्वेने नेरळ ते माथेरान मार्गावर सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या. त्यानंतर ऑक्टोबर 2017 मध्ये प्रथम अमन लॉज ते माथेरान अशी मिनी ट्रेन सेवा सुरू केली खरी, परंतु यंदाच्या अतिवृष्टीमुळे मिनी ट्रेनच्या ट्रकची अक्षरशः वाताहत झाली.



























































