सरावली गणातून वैभवी राऊत बिनविरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघर जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांच्या निवडणूक रणधुमाळीचा माहोल तापण्याआधीच शिवसेनेला विजयाचा कौल मिळाला आहे. पालघर पंचायत समितीच्या सरावली गणातून शिवसेनेच्या उमेदवार वैभवी राऊत बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पालघरसह सर्व आठ पंचायत समित्यांवर व जिल्हा परिषदेवर भगवाच फडकणार असल्याचे शुभसंकेत मिळाले आहे.

पालघर जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांसाठी 7 जानेवारीला मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 364 तर पालघर, विक्रमगड, जव्हार, वाडा, मोखाडा, डहाणू, तलासरी, वसई या आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी 667 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यावेळी पालघर पंचायत समितीच्या 34 सदस्य गणांपैकी सरावली मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव असलेल्या गणामध्ये शिवसेनेच्या वैभवी राऊत यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. आज नामनिर्देशनपत्राच्या छाननीच्या दिवशी त्यांचा अर्ज वैध ठरल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मतदानाच्या दुसऱया दिवशी म्हणजे 8 जानेवारीला त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणार असली तरी शिवसैनिकांनी आजच गुलाल उधळत विजयोत्सव साजरा केला.

  • पालघर पंचायत समितीमध्ये तारापूर, कुरगाव, दांडी, नवापूर, सालवड, पास्थळ, काटकर पाडा, बोईसर, दांडीपाडा, सरावली, उमरोळी, खैरापाडा, मान शिगाव-खुताड, ब्रहानपूर, टेन, कोंडान, मनोर, सावरे, सातपाटी, केळवासह 34 गण आहेत. त्यापैकी 12 गण अनुसूचित जमातीसाठी राखीव असून सहा महिलांसाठी आरक्षित आहेत. सरावली गणामधील एक गट मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहे.