
बेकायदा पार्किंगला चाप लावण्यासाठी पालिकेने 7 जुलैपासून सुरू केलेला 10 हजारांचा दंड वाहतुकीची शिस्त लागलेल्या ठिकाणी कमी होणार आहे. यामध्ये ट्रक, खासगी बस आणि पार्किंग व्यवस्था असलेल्या भागांत मात्र बेकायदा पार्किंगवर आकारला जाणारा दहा हजारांचा दंड मात्र कायम राहणार आहे. याबाबत उद्या 26 डिसेंबर रोजी होणाऱया बैठकीत निर्णय होणार आहे.
मुंबईत बेकायदा पार्किंगमुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्यामुळे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या धोरणानुसार बेकायदा पार्किंग करणाऱयांवर 5 ते 10 हजारांवर दंड आकरण्यात येत आहे. पालिकेच्या पार्किंगपासून 500 मीटरच्या आत बेकायदा पार्किंग केल्यास हा दंड वसूल केला जात आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीपासून मुंबईच्या अनेक भागांत बेकायदा पार्किंग कमी झाले असून शिस्तबद्ध पार्किंग केली जात आहे. त्यामुळे बेकायदा पार्किंगसाठी संपूर्ण मुंबईत सरसकट 10 हजारांचा दंड न आकारता विभागवार दंडरचना आणि वाहतुकीची शिस्त लागलेल्या ठिकाणी दंडाची रक्कम कमी करण्याबाबत पालिका विचार करीत आहे.
…तर पाच पट दंड आकारणार
सध्या बेकायदा पार्किंगसाठी दुचाकीला सुमारे 200 रुपये तर चारचाकी वाहनाला 500 रुपयांचा दंड आकारला जातो. शिवाय टोइंग चार्जही लावण्यात येतो. नव्या फॉर्म्युल्यानुसार पाच पट दंड आकारण्यात येणार असून दंड आणि टोइंग चार्ज मिळून दुचाकीला सुमारे अडीच ते तीन हजार आणि चारचाकी वाहनांना चार ते पाच हजारांचा दंड आकारला जाऊ शकतो.
बेकायदा पार्किंगविरोधात 10 हजारांची दंड आकारणी सुरू केल्यानंतर मुंबईच्या अनेक भागांत वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागली आहे. बेकायदा पार्किंग कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर बेकायदा पार्किंग दंडासंदर्भात नवा फॉर्म्युला तयार करण्यात येत असून सरसकट दंड न आकारता शिस्त लागलेल्या ठिकाणी कमी आणि विभागवार दंडरचना करण्यात येईल. – प्रवीण परदेशी, पालिका आयुक्त


























































