
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप व जदयू हे एकमेकांसोबत युतीत निवडणूक लढणार हे स्पष्ट झालेले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील भाजप-जदयूचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नितीश कुमारच असतील हे स्पष्ट केले आहे. मात्र आता या युतीत पुन्हा एकदा वादाचा खडा पडण्याची शक्यता आहे. जदयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी 2020 च्या निवडणूकीत जदयूला भाजपपेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात असा दावा केला आहे.
‘मला असं वाटतं लोकसभेसारखा पॅटर्न विधानसभेत लागू होणार नाही. बिहारमध्ये जदयू हा मोठा पक्ष आहे. विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार हा या युतीचा चेहरा आहेत. सध्या जदयूचे 70 आमदार आहेत तर भाजपचे जवळपास 50 च्या आसपास आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत भाजपपेक्षा जास्त जागा जदयूला मिळायला हव्यात’, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.
2015 ला झालेल्या बिहार विधानसभा निवडणूकीत भाजप व जदयू-राजद हे एकमेकांविरोधात लढले होते. या निवडणूकीत जदयू व राजदला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे जदयू व राजदने सत्ता स्थापन केले होते. मात्र ही युती फार काळ टिकली नाही. त्यानंतर जदयू व भाजपने युती करत सत्तास्थापन केले आहे.

























































