रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांनी साफसफाई करणाऱ्या व्यावसायिकांना चोपले, वाचा धक्कादायक बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fight
file photo

आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने काम करणारी जगात असंख्य मंडळी आहेत. याच भावनेतून काही व्यावसायिकांनी आपले शहर स्वच्छ रहावे यासाठी पुढाकार घेतला होता. गलिच्छ कचराकुंडीचे दृश्य बघवत नसल्याने आणि भटके कुत्रे, डास यांची समस्या वाढायला लागल्याने 8 व्यावसायिकांनी कचरा साफ करण्याचं ठरवलं, मात्र यामुळे त्यातल्या काहींना बेदम मार खावा लागला.

बंगळुरू शहरातील बाणशंकरी भागातील 80 फीट रोडवर नाल्यालगत कचरा फेकला जात होता. बंगळुरूतील 8 व्यावसायिकांनी तो साफ करायला सुरूवात केली. सगळा भाग साफ झाल्यानंतर तिथे काही लोकं कचरा टाकायला आले. त्यांना इथे कचरा टाकू नका असं म्हणत यातल्या काही व्यावसायिकांना दम दिला. यामुळे वाद सुरू झाला आणि या वादातून कचरा टाकणाऱ्यांनी साफ करणाऱ्या व्यावसायिकांना बेदम मारहाण केली.

अनिल कुमार (वय-39) आणि सतीश (वय- 36) या दोघांनी त्यांच्या 6 साथीदारांसह नाल्याच्या बाजूचा भाग साफ करायचं ठरवलं होतं. अनेकदा महापालिकेकडे तक्रारी करूनही हा कचरा साफ केला जात नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता. नाल्याजवळच्या या भागात चिकन आणि मटणाचे तुकडे फेकले जात होते. ज्यामुळे इथे भटके कुत्रे मोठ्या प्रमाणावर यायला लागले होते. या कुत्र्यांचा स्थानिकांना त्रास व्हायला लागला होता. या भागातील स्थानिकांनी कचरा साफ केल्यानंतर तिथल्या खांबांना चंदेरी रंग मारला आणि जाळ्यांनाही तसाच रंग मारला. हा भाग स्वच्छ दिसत असल्याने इथे कोणी कचरा टाकणार नाही असे वाटले होते. मात्र 26 तारखेला रात्री 11.30 वाजता काही जण इथे पुन्हा कचरा टाकायला आले. त्यांना अनिल कुमारने इथे कचरा टाकू नका असा दम दिला. 28 तारखेला एका रिक्षातून दोन माणसे या ठिकाणी उतरली आणि गोणीतून आणलेली घाण तिथे टाकली. यावेळी अनिल कुमार आणि सतीश यांनी घाण करणाऱ्यांना जाब विचारला. यावेळी झालेल्या वादामुळे कचरा टाकणारे निघून गेले मात्र तीन साथीदारांसह ते परत आले. त्यांनी सगळ्यांनी मिळून अनिल कुमार आणि सतीश यांना बेदम मारहाण केली.