
महाराष्ट्र, हरयाणापाठोपाठ झारखंडमध्ये जोरदार झटका बसल्यानंतर भाजप ताळ्यावर आली आहे. मित्रपक्षांशी पंगा महागात पडल्यामुळे यापुढील विधानसभा निवडणुकांत प्रादेशिक पक्षांना गोंजारण्याची रणनीती भाजपने आखली आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत ताठर भूमिका घेण्याऐवजी जनता दल युनायटेडला (जदयु) केंद्रात मंत्रीपद देण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत.
‘सीएए’ आणि ‘एनआरसी’मुळे मोदी सरकारविरोधात संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण तयार झाले. त्यातच महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडच्या निवडणुकांत भाजपचा पराभव झाला. त्या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभेसाठी भाजपने आपली रणनीती बदलली आहे. येथील निवडणुकीत मित्रपक्ष जदयुला कोणत्याही परिस्थितीत न दुखावण्याचे भाजपने ठरवले आहे. जदयुने आतापर्यंत सीएए आणि एनआरसीला विरोध केला आहे. मात्र आता त्यांना आपलेसे करण्यासाठी भाजपकडून जदयुचे नेते राजीव रंजन (लल्लन) सिंह आणि रामचंद्र प्रसाद सिंह यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या दोघांना मंत्रीपद देण्याची मागणी भाजपने धुडकावली होती व गिरीराज सिंह यांना मंत्रीपद दिले होते.
सीएम म्हणून नितीश कुमार यांच्या नावाला सहमती
मुख्यमंत्रीपद आपल्याच पक्षाच्या उमेदवाराकडे असायला हवे या हट्टाची किंमत भाजपला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत चुकवावी लागली आहे. त्यामुळे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळाले असल्याने यापुढे हा धोका टाळण्याची खबरदारी भाजपने घेतली आहे. अमित शहा यांनी याआधीच जदयुचे अध्यक्ष नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली आहे.
भाजपला नकोय त्रिशंकू निवडणूक
एकापाठोपाठ एक राज्ये हातातून गेली तर केंद्रातील सत्ताही डळमळीत होईल ही भीती भाजपला सतावू लागली आहे. त्यामुळे बिहारमध्ये त्रिशंकू निवडणूक होऊ नये अशी भाजपची इच्छा आहे. त्रिशंकू निवडणूक झाल्यास राष्ट्रीय जनता दलाला (राजद) पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा होईल. विशेष म्हणजे राजदने सीएए आणि एनआरसीचा मुद्दा पुढे रेटून सत्ता मिळवण्याचा चंग बांधला आहे.


























































