
देशातील सर्वोत्तम वैद्यकीय संस्था मानल्या जाणाऱ्या पीजीआय चंदीगडमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जिवंत बाळ शवविच्छेदनासाठी पाठवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे बाळ अवघ्या सहा महिन्यांचे होते असं कळालं आहे.
चंदीगडच्या नयागाव, दशमेश नगराचे रहिवासी असलेल्या संतोष कुमार यांची पत्नी गर्भवती होती. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या महिलेच्या अल्ट्रासाऊंड चाचणीत कळाले की पोटातील बाळामध्ये काहीतरी व्यंग आहे. यामुळे पीजीआय रुग्णालयात महिलेला दाखल करून तिच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांनंतर संतोष कुमार यांना सांगण्यात आले की बाळाच्या पाठीचा कण्यामध्ये समस्या आहे आणि हे बाळ जन्मल्यानंतर अवघी दोन वर्षच जगू शकेल. डॉक्टरांनी संतोष कुमार याला पत्नीचा गर्भपात करण्याचा सल्ला दिला. मात्र गर्भाची वाढ ही 20 आठवड्यांपेक्षा जास्त झाल्याने संतोष कुमार याला गर्भपातासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठवायला लागला. न्यायालयाने पीजीआयच्या तज्ज्ञांचे मत मागवले आणि ते पाहिल्यानंतर गर्भपाताला परवानगी दिली.
20 डिसेंबर रोजी संतोषने पत्नीला पीजीआयमध्ये दाखल केले. 26 डिसेंबर रोजी पीजीआयच्या पथकाने तिचा गर्भपात केला. गर्भपात झाल्यानंतर काहीही तपासणी न करता डॉक्टरांनी बाळाला शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. जेव्हा बाळाचे पोस्टमार्टम करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली तेव्हा डॉक्टरांच्या निदर्शनास आले की बाळ जिवंत आहे आणि त्याच्या हृदयाचे ठोके सुरू आहे. ही बाब जेव्हा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांना सांगण्यात आली तेव्हा त्यांनी बाळाचा मृत्यू होईपर्यंत वाट पाहा असे संतापजनक उत्तर दिले. या प्रकारानंतर हे बाळ जवळपास 12 तास जिवंत होते. जेव्हा बाळाचा मृत्यू झाला तेव्हा ते पुन्हा पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले.

























































