‘ऑपरेशन मेघदूत’ने पाकडय़ांची उडवली होती झोप, लेफ्टनंट जनरल प्रेम नाथ हून यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सियाचीनसारखे उंच ठिकाण, तापमान उणे 40 ते 60 डिग्री सेल्सियस. श्वास घेताना होणारा प्रचंड त्रास…अशा परिस्थितीत प्रशिक्षित हिंदुस्थानी सैनिकांची तुकडी घेऊन त्यांनी सियाचीनमध्ये ‘ऑपरेशन मेघदूत’ लॉन्च केले. सियाचीन घेण्याचा पाकडय़ांचा मनसुबा होता. 13 एप्रिल 1984 रोजी हिंदुस्थानी सैन्याने सियाचीन आणि आजूबाजूच्या हिमशिखरांवर कब्जा केला आणि पाकडय़ांचा डाव उधळून लावला. हे ऑपरेशन यशस्वी करून दाखवणाऱया निवृत्त लेफ्टनंट जनरल प्रेम नाथ हून यांनी वयाच्या 91व्या वर्षी मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता चंदिगढ येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

हून यांच्यावर पंचकुला येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. सोमवारी त्यांची प्रकृती अधिक खालावली होती. हिंदुस्थानने 1984 मध्ये हून यांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर झालेल्या पहिल्या लढाईत विजय मिळवला होता. पाकिस्तानचा डाव उधळून लावत सियाचीन आणि आजूबाजूच्या हिमशिखरांवर तिरंगा फडकवला होता. पाकिस्तानच्या एwबटाबाद या ठिकाणी हून यांचा जन्म झाला होता. फाळणीनंतर ते हिंदुस्थानात आले. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना विशेष सेवा पदकानेही गौरवण्यात आले होते. जम्मू-कश्मीर आणि एलओसीवरील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानशी तीन वेळा चर्चा करण्याची संधी हून यांना मिळाली होती. 1987 मध्ये ते लष्करातून निवृत्त झाले होते. 2013 मध्ये हून यांनी राजकारणात प्रवेश केला. दरम्यान, सियाचीनमधील हिंदुस्थानचे ऑपरेशन हे जगातील सर्वात धाडसी लष्करी कारवायांमध्ये गणले जाते. उणे तापमानातही जवानांनी अतुलनीय शौर्य गाजवत पाकडय़ांना पराभवाची धूळ चारली होती. ‘ऑपरेशन मेघदूत’नंतर त्यांनी अनेक धाडसी मोहिमांत आणि युद्धात यशस्वी धुरा सांभाळत शौर्य गाजवले होते.

पाकिस्तानने सुरू केले होते ‘ऑपरेशन अबअबील’

पाकिस्ताननेही सियाचीनवर कब्जा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी  ‘ऑपरेशन अबअबील’ सुरू केले. त्यासाठी त्यांनी सैनिकांची एक तुकडी तयार केली. बर्फात वापरण्यात येणाऱया साहीत्यासाठी त्यांनी लंडनच्या एका कंपनीशी संपर्क साधला; परंतु दुर्दैवाने हीच कंपनी हिंदुस्थानलाही साहित्य देणार होती. अशाप्रकारे हिंदुस्थानला पाकिस्तानचे मनसुबे समजले. त्यानंतर हिंदुस्थाननेही आपली रणनीती आखली होती.

असे झाले होते 1984चे युद्ध

हिंदुस्थानने 1081 मध्येच सियाचीन आणि हिमशिखरांवर कब्जा मिळवण्याचा निर्णय घेतला होता. सियाचीनवरील उणे तापमानात सैनिकांना तग धरून राहायचे होते. त्यासाठीचे कठोर प्रशिक्षण सैनिकांना देण्यात आले. 1982 मध्ये हिंदुस्थानने अंटार्क्टिका सैनिकांचे एक पथक सियाचीनमध्ये पाठवले. याबाबत पाकिस्तानला कळताच हिंदुस्थान सियाचीनवर कब्जा तर करणार नाही ना याची भीती त्यांना सतावू लागली होती. दरम्यान, ‘ऑपरेशन मेघदूत’साठी हिंदुस्थानने 13 एप्रिल ही तारीख निवडली. या दिवशी ‘वैसाखी’ हा सण होता. त्यामुळे हिंदुस्थान सण साजरा करण्यात मश्गूल असेल असे पाकडय़ांना वाटले. परंतु, हिंदुस्थानने सियाचीनवर चढाई करून ‘ऑपरेशन मेघदूत’ यशस्वी करून दाखवले. सियाचीन आणि आजूबाजूच्या हिमशिखरांवर कब्जा केला. पाकिस्तानसाठी ही सर्वात लाजिरवाणी हार होती.