
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक एसआयटीने झारखंड पोलिसांच्या मदतीने ऋषिकेश देवडीकर याला ताब्यात घेतले. धनबाद जिल्हय़ातील कतरास येथे उद्योगपती प्रदीप खेमका यांच्या पेट्रोलपंपावर तो नाव बदलून नोकरी करत होता. देवडीकरच्या घराची झडती घेण्यात आली असून त्यात सनातन संस्थेची पुस्तके जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
5 सप्टेंबर 2017 रोजी बंगळुरूच्या अतिशय सधन परिसरात राहणाऱया ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची घराच्या समोरच गोळय़ा घालून हत्या करण्यात आली होती. अंनिसचे नरेंद्र दाभोलकर, डावे विचारवंत गोविंद पानसरे यांच्यापाठोपाठ झालेल्या या तिसऱया हत्येने देश ढवळून निघाला. कर्नाटक पोलिसांनी या हत्येच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली. दोन वर्षांपासून एसआयटीचे पथक या हत्येचे धागेदोरे शोधत होते. झारखंड येथील धनबाद जिल्हय़ाच्या कतरास येथे या प्रकरणातील संशयित वास्तव्य करून असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक पुनीथकुमार यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीच्या पथकाने पाच दिवसांपासून तेथे डेरा टाकला.
संपूर्ण खातरजमा झाल्यानंतर कतरास येथील उद्योगपती प्रदीप खेमका यांच्या पेट्रोलपंपावर आज धाड टाकून एसआयटीने ऋषिकेश उर्फ मुरली उर्फ राजेश उर्फ शिवा (44) याला ताब्यात घेतले. प्रदीप खेमका यांनीच त्याला राहण्यासाठी घरही किरायाने दिले होते. पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्याठिकाणी सनातन संस्थेची अनेक पुस्तके तसेच इतर साहित्य आढळून आले. एसआयटीने प्रदीप खेमका यांचीही चौकशी केली. त्यात खेमका यांनी सात महिन्यांपूर्वी आपण एका परिचितांच्या सांगण्यावरून राजेश याला नोकरी तसेच राहण्यासाठी घर दिल्याचे सांगितले.
पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक एसआयटी व झारखंड पोलिसांनी ऋषिकेश उर्फ राजेश याला अटक केल्याचे धनबादचे पोलीस अधीक्षक किशोर कौशल यांनी सांगितले. नाव बदलून हा येथील एका पेट्रोलपंपावर काम करत होता असे कौशल म्हणाले. या हत्याप्रकरणात अगोदर पकडण्यात आलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून ही अटक करण्यात आल्याचेही कौशल यांनी स्पष्ट केले.
धनबाद येथील न्यायालयासमोर ऋषिकेश देवडीकर याला हजर करण्यात येणार असून त्यानंतर बंगळुरूत अधिक चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मूळ सोलापूर, संभाजीनगरात वास्तव्य
ऋषिकेश देवडीकर हा मुळचा सोलापूर येथील रहिवासी आहे. 2012 मध्ये संभाजीनगरात आला. सिडकोच्या एन-9 भागात त्याने यशवंत शुक्ला यांचे घर भाडय़ाने घेतले. आई-वडील व पत्नी, सात वर्षांची मुलगी असा परिवार येथे वास्तव्य करून होता. ऋषिकेशने घरातच पंतजलीचे साहित्य विक्रीचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करत असतानाच तो सनातन संस्थेचा कार्यकर्ता म्हणूनही काम करत होता. व्यवसाय वाढल्यामुळे त्याने एम-2 भागात जगदीश कुलकर्णी यांचे दुकान भाडय़ाने घेतले. तेथे संस्कृती या नावाने व्यवसाय थाटला. व्यवसाय जोरात असतानाच ऋषिकेशने 2016 मध्ये सनातनचे पुर्णवेळ काम करायचे आहे असे सांगून दुकान बंद केले. त्यानंतर ऋषिकेश पत्नी व मुलीला घेऊन गोव्याला जायचे आहे असे सांगून त्याने संभाजीनगर सोडले. तेव्हापासून तो गायबच होता. त्याचे आईवडील 2019 मध्ये शुक्ला यांचे घर सोडून मुंबईला दुसऱया मुलाकडे निघून गेले.

























































