पडेगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर येथील पडेगाव भागात मोकाट कुत्र्यांनी अडीच वर्षाच्या चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. स्थानिक नागरिकांनी कुत्र्यांच्या हल्ल्यातून चिमुकल्याचा बचाव करीत त्यास घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून मनपाकडून कुत्रे पकडण्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

शहरातील टाऊनहॉल परिसरात राहणारे राजू वक्ते यांचा अडीच वर्षाचा मुलगा रोहित हा आजी कुसुम वक्ते यांच्याकडे पडेगावला शनिवारी आला होता. रविवारी सकाळी पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गालगत खेळण्यासाठी गेला असता त्याच्यावर आठ ते दहा मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवला. कुत्र्यांच्या हल्ल्यात रोहित रक्तबंबाळ झाला असून डोक्यापासून हातापायापर्यंत कुत्र्यांनी चावा घेवून गंभीर जखमी केले. यावेळी या भागातील स्थानिक नागरिकांनी धावत जावून रोहितची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. गंभीर जखमी अवस्थेत रोहितला त्याच्या आईने घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु घाटी रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध नसल्यामुळे बाहेरुन ही लस मागविण्यात आल्याचे वक्ते कुटुंबियांनी सांगितले. पडेगावात कचरा प्रक्रिया प्रकल्प अद्याप सुरु झालेला नाही. परंतु कचरा टाकला जात असल्याने त्या ठिकाणी कुत्र्यांच्या टोळया फिरत आहे. या कुत्र्यांच्या टोळींकडून धुमाकूळ घातला जात असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. महानगरपालिकेने तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली.