
उन्नाव बलात्कार प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांवर उपचार करणारे डॉक्टर प्रशांत उपाध्याय यांचा सोमवारी संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. बलात्कार पीडितेच्या वडिलांना मारहाण झाल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टर प्रशांत उपाध्याय आपात्कालीन कक्षात कार्यरत होते. त्यांनी पीडितेच्या वडिलांवर उपचार करून त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवले होते.
या घटनेनंतर वादविवाद सुरू झाल्यावर सीबीआयने चौकशी सुरू केली. त्यानंतर डॉक्टर प्रशांत उपाध्याय यांना निलंबित करण्यात आले होते. बऱ्याच काळानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. सध्या ते फत्तेहपूरमध्ये कार्यरत होते. संशयास्पद स्थितीत सोमवारी डॉक्टर प्रशांत उपाध्याय यांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच त्यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. डॉक्टर उपाध्याय मधुमेहग्रस्त होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे हे कारण असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.



























































