सामाजिक सलोखा ठेवून केलेले समाजकार्यही देशसेवाच – कर्नल तरूण जामवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणीतील सैन्यभरती दरम्यान आलेल्या तरूणांची आबाळ पाहून पाणी, वीज बचत गटाचे सदस्य धावून आले व जात धर्म न बघता एकजुटीने तरुणांच्या पाठीशी उभे राहीले. गटाच्या या तंबूत सर्व जातीधर्मातील व सामान्य कष्टकऱ्यांपासून ते डॉक्टर, अधिकारी व व्यापारी अशा सर्व स्तरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन जमेल तसा वाटा उचलत तरुणांची व्यवस्था केली व आपले देशाप्रती असलेले कर्तव्य दर्शवून दिले. आपल्या गटाची प्रथम दिवस 4 ते 13 जानेवारीपर्यंत चालू असलेली निवास व भोजनाची अविरत विनामुल्य सेवा व्यवस्था कौतुकास्पद आहे. ही निरपेक्ष सेवा, एकोपा, निश्चितच सैन्याचे मनोबल वाढवणारी आहे, असे प्रतिपादन कर्नल तरूण जामवाल यांनी केले.

पाणी, वीज बचत गटाच्या पुढाकाराने परभणीत सैन्यभरतीसाठी आलेल्या तरूणांची निवास व भोजनाची पूर्णवेळ मोफत व्यवस्था करण्यात आली होती. राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जयंतीच्या औचित्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यात सहकार्य करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून कर्नल जामवाल बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक राज्यकर आयुक्त निलेश शेवाळकर तर अध्यक्षस्थानी तहसीलदार विद्याचरण कडावकर यांची उपस्थिती होती. प्रतिमा पुजनानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कर्नल जामवाल यांना शिवप्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला.

कर्नल जामवाल म्हणाले, सीमेवर जाऊन लढाई करणे हीच देशसेवा नसून तुम्ही आहात तिथे राहूनही देशसेवा करु शकता. परभणीत सैन्यभरती दरम्यान पाणी-वीज बचत गट, त्यांचे सर्व सहकारी व इतर परभणीकर ज्याप्रमाणे सेवा करत होते. त्यावरून असे म्हणावे वाटते की आम्ही योग्य माणसांसाठी सीमेवर उभे आहोत. सर्व नागरिक एकविचाराने, सलोख्याने असेच वागले तर सैन्याचे मनोबल निश्चितच वाढते. यातील सर्व कार्यकर्त्यांचे व नागरिकांचे कार्य कौतुकास्पद आहे.प्रास्ताविकात बचत गटाचे अध्यक्ष रणजित कारेगांवकर यांनी सांगितले की, देशसेवेच्या उद्देशाने परभणीत सैन्यभरतीसाठी हजारो तरूण येत होते, त्यांचे हाल पाहून आम्ही ठरवले की या तरूणांची सोय करायची, पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली गटाने सुरवातीच्या दिवसापासून ही व्यवस्था केली. तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी अध्यक्षीय समारोपात गटाच्या कार्याचे कौतुक केले.