
26 जानेवारीला प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचा शुभारंभ होणार आहे. गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात स्वच्छ, पोषक व पदार्थाची गुणवत्ता राखून ताजे भोजन दिले जाणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. शिवभोजन योजनेसंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात आज झाली. यावेळी भुजबळ बोलत होते. शिवभोजन केंद्र चालविण्यासाठी शक्यतो जास्तीत जास्त महिला बचतगटांची निवड करण्यात येईल. केंद्र चालविणाऱ्या महिलांना व पुरुषांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठीचे आवश्यक सॉफ्टवेअर सिस्टीम विकसित करण्यात येईल. स्वच्छतेचे सर्व निकष पाळले जातील.
50 हून अधिक ठिकाणी सुरुवात
अन्नपदार्थ तयार करण्यासाठी ही स्वच्छ फिल्टर्ल्ड पाण्याचा वापर केला जाईल. शिवभोजन घेणाऱ्यांसाठी स्वच्छ टेबल, खुर्च्यांची व्यवस्था असेल. आवश्यकतेनुसार फ्रिजचा वापर केला जाईल. तसेच राज्यात पहिल्या टप्प्यात 50 पेक्षा अधिक ठिकाणी शिवभोजन केंद्रांचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
























































