
गोरेगावच्या पत्रा चाळीतील रहिवाशांचे थकीत भाडे, पुनर्वसन प्रक्रिया, म्हाडाच्या सोडतीमधील 306 विजेत्यांना सदनिका वितरित करण्याच्या संदर्भात पुढील पंधरा दिवसांत उपाययोजना सुचवण्यासाठी राज्याचे निवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पत्रा चाळीतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गोरेगाव येथील पत्रा चाळ प्रकल्प तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हाडाला दिले होते. पत्रा चाळीतील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाईही उपस्थित होती. या बैठकीनंतर पत्रा चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण विभागाने निवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची नियुक्ती केली आहे. पत्रा चाळीचे विविध प्रलंबित प्रश्न तसेच न्यायालयातील इतर बाबींच्या संदर्भात उपाययोजना सुचवण्याची जबाबदारी जॉनी जोसेफ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्याबाबतचा अहवाल येत्या पंधरा दिवसांत ते राज्य सरकारला सादर करतील.

























































