माटुंगा पोलीस वसाहतीत मोठी दुर्घटना टळली, घरातल्या सिलिंगचा स्लॅब कोसळून पोलीस पत्नी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माटुंगा नवीन पोलीस वसाहतीत शनिवारी रात्री मोठी दुर्घटना टळली. तळमजल्यावर राहणारे कॉन्स्टेबल संतोष छतिसे यांच्या घरातील स्लॅब कोसळला. यात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. सुदैवाने रात्री उशिरा ही घटना घडली नाही.

बीकेसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले संतोष छतिसे हे पोलीस वसाहतीतील एक विंगमध्ये तळमजल्यावर खोली क्रमांक 3 मध्ये पत्नी, मुलगा व आईवडिलांसोबत राहतात. आईवडिल गावी गेल्याने तर संतोष कामावर असल्याने शनिवारी रात्री घरात मुलगा आणि पत्नीच होते. रात्री दहाच्या सुमारास संतोष यांची पत्नी व मुलगा जेवण करत होते. जेवण झाले म्हणून मुलगा उठून बाजूला गेला तेवढ्यात सिलिंगचा स्लॅब पूर्णपणे खाली कोसळला. हा आवाज इतका भीषण होता की इमारतीमधील सर्वांनी छतिसे यांच्या खोलीकडे धाव घेतली. स्लॅब पडल्याने संतोष यांच्या पत्नीच्या पायाला फ्रॅक्चर झाले तर त्यांचा मुलगा सुदैवाने बचावला. छतिसे कुटुंब रात्री झोपेत असताना हा प्रकार घडला असता तर मोठा अनर्थ घडला असता.

दरम्यान, सिलिंगबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात वारंवार तक्रारी दिल्या परंतु तेथून कधीच गंभीर दखल घेतली गेली नाही. आता स्लॅब कोसळल्यानंतर पीडब्ल्यूडीचे अधिकारी घरी येऊन दुरुस्तीचे काम करण्यासाठी तयार झाले आहेत. त्यांच्या विरोधात मी रीतसर तक्रार दिल्याचे संतोष यांनी सांगितले.