
चीनमध्ये हाहाकार माजवणार्या ‘कोरोना’ व्हायरसची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून जगभरात भीतीचे सावट पसरले आहे. त्यामुळे ‘कोरोना’पासून बचावासाठी हिंदुस्थानच्या एअर इंडिया, इंडिगोसह अनेक देशांच्या विमान कंपन्यांनी चीनकडे जाणार्या आपल्या फ्लाईटस् रद्द केल्या आहेत. त्यामुळे चीनशी अनेक देशांनी संपर्क तोडल्यासारखी स्थिती आहे. दरम्यान पुढील आठवड्यात नवी दिल्ली येथे होणार्या ऑटो एक्स्पोमध्ये ‘कोरोना’चे सावट आहे.
चीनच्या हुबिई प्रांतातील वुहान शहरात पहिल्यांदा गेल्या आठवड्यात ‘कोरोना’ व्हायरसची लागण झाली. हा व्हायरस चीनमध्ये अनेक शहरांत पसरला. आतापर्यंत या व्हायरसने 132 जणांचा बळी घेतला असून 6061 जणांना लागण झाली आहे.
हिंदुस्थानात मुंबई, पुण्यासह काही शहरांत संशयित रुग्ण आढळले आहेत. जर्मनी, जपान, संयुक्त अरब अमिरात, हाँगकाँग, थायलँडसह अनेक देशांमध्ये ‘कोरोना’चे संशयित रुग्ण आहेत. सर्व संशयित रुग्ण चीन दौर्यावरून आलेले आहेत.
‘कोरोना’पासून बचावासाठी चीनला जाणार्या अनेक देशांनी आपली विमान उड्डाणे काही काळासाठी रद्द केली आहेत. एअर इंडियाने दिल्ली-शांघाई फ्लाईटस् 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवल्या आहेत. वुहानमधील 250 हिंदुस्थानींना मायदेशी आणण्याची तयारी सुरू केली आहे.
केंद्र सरकार आणि कंपन्यांकडून ट्रव्हल ऍडव्हायजरी
- चीनमध्ये जाणे टाळा.
- अत्यावश्यक काम असेल तरच चीनचा प्रवास करा.
- ‘कोरोना’पासून बचावासाठी वैद्यकीय काळजी घ्या, अशी ट्रव्हल ऍडव्हायजरी केंद्र सरकारने जारी केली आहे.
- तसेच काही कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱयांसाठी ऍडव्हायजरी जाहीर केली.



























































