रेल्वे अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचे डोळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी रेल्वे बजेटमध्ये यंदा काही भरीव आर्थिक तरतूद मिळणार का याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपीच्या प्रकल्पांसाठी नेमकी किती आर्थिक तरतूद केली जाते याकडे आशेने पाहिले जात आहे. या रेल्वे अर्थसंकल्पात 1087 कोटींच्या पनवेल ते दिवा व्हाया वसई या नव्या कॉरीडॉरला मंजूरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एमयूटीपी प्रकल्पांना 600 कोटी रूपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. त्यालाही मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.

एमयुटीपी प्रकल्पांना शनिवारी सादर होणार्या केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक बळ मिळण्याची शक्यता आहे. या रेल्वे अर्थसंकल्पात 1087 कोटींच्या पनवेल ते वसई नव्या उपनगरीय मार्गासाठी मंजूरी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच एमयुटीपी-2, 3 व 3 ए साठी 600 कोटी रुपये मंजुर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या पनवेल ते वसई मार्गावर मेमू ट्रेन धावत असून लांबपल्ल्यांच्या गाडयाही येथे थांबत असतात.

वसई ते पनवेल अंतर 15 ते 20 मिनिटांनी कमी होणार
या मार्गावर निळजे आणि कोपर स्थानकांदरम्यान 4.5 कि.मी.चा जोड मार्ग बांधण्याची योजना आहे. त्यामुळे वसई आणि पनवेल मधील अंतर 15 ते 20 मिनिटांनी कमी होणार आहे. या मार्गावर ऑटोमेटिक सिग्नलींग यंत्रणा उभारण्यात येणार असून त्यावर वातानुकूलित लोकल चालविण्याची योजना आहे. त्यामुळे दिवा -वसई -पनवेल मार्गावर नवीन डोंबिवली, नवीन पनवेल यासह अकरा नव्या स्थानकांचीही भर पडणार आहे. हा मार्ग बांधण्यास चार वर्षांचा कालावधी लागणार असून उपनगरीय रेल्वेशी कधीही न जोडलेला भाग या योजनेमुळे जोडला जाणार आहे.