‘गुगल मॅप’ हॅक; 99 स्मार्टफोन एकाच रस्त्यावर; ट्रॅफिक नसलेल्या ठिकाणी दाखवली वाहतूककोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुगल मॅपसोबत बर्लिनमधील सिमॉन नावाच्या एका युजर्सने मोठा प्रॅक (थट्टा) केला आहे. सिमॉनने तब्बल 99 स्मार्टफोनच्या मदतीने ट्रफिक नसलेल्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक असल्याचे भासविले आहे. जगभरातील अनेक युजर्स ट्रफिक अपडेट घेण्यासाठी गुगल मॅपचा वापर करतात, पण सिमॉनने ट्रफिकच्या केलेल्या खेळखंडोब्यामुळे बर्लिनमध्ये ट्रफिक अपडेट घेणाऱया युजर्सना ‘त्या’ रस्त्याऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला.

सिमॉनने एका छोटय़ा ट्रॉलीमध्ये 99 स्मार्टफोन एकत्र ठेवले. या सर्व स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप ऑन होते. स्मार्टफोन ठेवलेली ट्रॉली घेऊन सिमॉन एका निर्मनुष्य रस्त्यावर फिरायला गेला. गुगल मॅप सिमॉनची ही कृती समजू शकले नाही आणि मोकळ्या रस्त्यावर वाहतूककोंडी असल्याचे गुगल मॅपने दाखविले. सिमॉनच्या या थट्टेमुळे कुणाचेही नुकसान झाले नाही. मात्र त्या रस्त्यावरून प्रवास करू इच्छिणाऱया युजर्सना गुगल मॅपने पर्यायी रस्ता वापरण्याची सूचना केली.

गुगल मॅपमध्ये हवी सुधारणा

रस्ता माहीत असूनही अनेक युजर्स त्या रस्त्यावरील टॅफिक अपडेट जाणून घेण्यासाठी गुगल मॅपचा वापर करतात. मात्र या हॅकिंगनंतर गुगल मॅपवर विश्वास ठेवण्यास युजर्स तयार नाहीत. सिमॉनच्या या प्रॅकनंतर गुगल मॅपला आपल्या सेवेत अधिक सुधारणा करण्याची गरज आहे. या प्रॅकमुळे गुगलला एक अलर्टही मिळाल्याचे बोलले जात आहे.

तीन रंगांत वाहतूककोंडीची माहिती

जगभरात वाहतूककोंडीची माहिती देण्यासाठी गुगल तीन रंगांचा वापर करते. हिंदुस्थानात त्यासाठी लाल, पिवळा आणि निळा रंग वापरला जातो. लाल रंगाचा अर्थ म्हणजे प्रचंड वाहतूककोंडी, पिवळा रंग म्हणजे कमी ट्रफिक आणि निळ्या रंगाचा अर्थ वाहतूककोंडी नाही असा होतो.