कोस्टल रोडच्या कामाचा धडाका; डेडलाइनआधीच पूर्ण होणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे काम सध्या धडाक्यात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी देताच पुढील अवघ्या दीड महिन्यात प्रकल्पाचे दहा ते बारा टक्के काम पूर्ण झाले आहे. मरीन लाइन्स, प्रियदर्शनी पार्क, ब्रीच कॅण्डी, हाजी अली, वरळी सी-फेस अशा वेगवेगळय़ा ठिकाणी एकाचवेळी सपाटीकरण, समुद्र भिंत, जलवाहिनी, भूपरीक्षण अशा कामांचा धडाका सुरू आहे. डिसेंबर 2022 च्या डेडलाइनआधीच कोस्टल रोडची स्वप्नपूर्ती करण्याचा चंग प्रशासनाने बांधला आहे.

मच्छीमार बांधवांच्या विरोधामुळे सर्वोच्च न्यायालयाने प्रकल्पाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती न्यायालयाने 17 डिसेंबरला उठवल्यानंतर प्रकल्पाच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे. एल.ऍण्ड टी. आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन या दोन कंत्राटदार कंपन्यांकडून एकाचवेळी काम केले जात आहे. जगातील सर्वात वेगवान मशीन असलेल्या आरसीडीमार्फत (रिव्हर्स सर्क्युलेटरी ड्रिलिंग) ड्रिलिंगचे काम केले जात आहे. वरळीतील भूपरीक्षणाचे काम मार्चअखेरीपर्यंत संपण्याची चिन्हे आहेत. कोस्टल रोड वरळी सी फेसवरून वांद्रे-वरळी सी लिंकला जोडला जाणार आहे. वरळीत भराव टाकण्याच्या कामाने प्रचंड वेग घेतला आहे.

2200 टनची टीबीएम एप्रिलनंतर येणार

तब्बल 2200 टन वजनाची टीबीएम मशीन एप्रिलनंतर चीनमधून समुद्रमार्गे मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर तीन महिन्यांनी प्रत्यक्ष टनेलिंगचे काम सुरू होईल. ही मशीन प्रियदर्शनी पार्क येथून खाली उतरवण्यात येणार असून टनेलिंग करीत चर्नी रोड येथील मफतलाल क्लबच्या बाजूला बाहेर पडणार आहे. मलबार हिलच्या खालून हे टनेलिंगचे काम चालणार आहे.

डेडलाइन पाळणार

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे प्रकल्पाला सहा महिन्यांचा विलंब झाला. मात्र या विलंबाचा डेडलाइनवर परिणाम होऊ देणार नाही. जगातील सर्वाधिक वेगवान मशिनरीजची मदत घेत प्रकल्पाचे काम डिसेंबर 2022 च्या डेडलाइनआधीच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळय़ासमोर ठेवले आहे, असे एलऍण्डटी या कंत्राटदार कंपनीतील एका अधिकाऱयाने सांगितले.

  • प्रकल्पांतर्गत 70 हेक्टरवर हरितपट्टा तयार केला जाणार असून 20 हेक्टरवर डांबरी रस्त्याचे काम केले जाणार आहे.
  • मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेने 12 हजार कोटींचा कोस्टल रोड प्रकल्प हाती घेतला आहे. या रोडमुळे दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगर हा दोन तासांचा रस्तेप्रवास अवघ्या 40 मिनिटांवर येणार आहे.