
हिंगणघाट येथे एका तरुणीला एकतर्फी प्रेमातून पेटवण्यात आलं. या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत. राज्याच्या महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी या पीडितेची गुरुवारी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपल्या भावना एका फेसबुक पोस्टद्वारे मांडल्या आहेत. या फेसबुक पोस्टमधील मजकूर खालीलप्रमाणे आहे.
पेटवणाऱ्या हातांना चांगला संस्कार द्या
काही दिवस आपल्या आयुष्यात कधीच येऊ नयेत असं आपल्याला वाटतं. आजचा दिवस माझ्यासाठी तसाच होता. हिंगणघाट जळीत प्रकरणातल्या पिडीत तरूणीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नागपूरच्या ऑरेंज सिटी रूग्णालयात जाऊन आले. तिथून आल्यापासून मी सुन्नच आहे. घरी येऊन मी खूप रडले. डोक्यात असंख्य विचार घुमतायत. डोळ्यासमोरून पिडीत तरुणीचा चेहरा जात नाही, तिच्या परिवाराशी झालं ते बोलणं अजूनही कानांत घुमतंय. इतकी सुंदर मुलगी, शिकवली नसती, शाळेत पाठवली नसती तर आज लग्न करून नांदत असती. शिकवून चूक केली का? हे तिच्या आईचं वाक्य तर कानात उकळतं तेल ओतल्यासारखंच वाटतं. शाहू-फुले-आंबेडकर-सावित्रीबाईंचा महाराष्ट्र, शिवरायांचा महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र.. आज अख्ख्या महाराष्ट्राचा पराभव झाल्यासारखं वाटलं. हरल्यासारखं वाटलं.
हिंगणघाट प्रकरणातील पीडित तरुणीची आज जगण्यासाठी धडपड सुरू आहे. तिला उत्तमोत्तम वैद्यकीय सुविधा दिल्या जातायत. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी मी बराच वेळ चर्चा केली. तिचं वाचणं आणि पुन्हा सामान्य जीवन जगणं माझ्यासाठी खूप आवश्यक आहे. एक मंत्री म्हणून नाही तर एका मुलीची आई म्हणून. असंख्य विचारांचं काहूर आज माझ्या मनात आहे. मी माझ्या मुलाला नेहमी सांगते महिलांचा सन्मान कर. आज महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम आयांना मला सांगायचंय आपल्या मुलांना एकदा हिंगणघाट, औरंगाबाद, मीरारोड आणि महाराष्ट्राच्या-देशाच्या कानाकोपऱ्यातील महिला अत्याचाराच्या पीडितांचं दुःख सांगा. त्यांना शिकवा की, बाईला नाही बोलण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्याने मान्य केला पाहिजे. स्त्री ही एक स्वतंत्र मनुष्यप्राणी आहे. तिला फक्त शरीर नाही, तिला मन पण आहे, बुद्धी पण आहे, विचार आहेत. तिला तिचा मार्ग निवडण्याचा अधिकार आहे. तमाम आयांना माझं हे ही सांगणं आहे की, मुलींच्या-बायकांच्या वागणं, पेहराव यावरून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, कदाचित आपला मुलगा यातून ही काहीतरी शिकत असेल. मुलांना समजलं पाहिजे की स्त्रीवर अधिकार गाजवणं चुकीचं आहे. हिंसा करणं, जिवे मारणं, जाळून मारणं, ऍसिड फेकणं याला प्रेम म्हणत नाहीत. एकतर्फी प्रेम ही एक नवीन व्याख्या रूढ होऊ पाहतेय. एकतर्फी असलेल्याला प्रेम कसं म्हणता येईल.
फेब्रुवारी महिना तरुणाईत प्रेमाचा महिना म्हणून साजरा केला जातो. प्रेमाच्या नावाने अशा हिंसा होत राहिल्या तर लोकांचा प्रेमावरचा विश्वास उडून जाईल. त्यामुळे माध्यमांनीही संवेदनशीलता दाखवत हा शब्द वापरणं बंद केलं पाहिजे. या घटनांच्या निमित्ताने समाजानेही सजग पणे आपल्या आसपास होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांच्या बाबतीत बोललं पाहिजे. त्या रोखल्या पाहिजेत. आपल्या पोरीबाळींसाठी एक सुरक्षित समाज, वातावरण देणं आपलं काम आहे. ज्या समाजातील मुली सुरक्षित तो समाज पुढारलेला मानला जातो. आपलं पुढारलेपण आज संकटात आहे. हिंगणघाटच्या माझ्या बहिणीचा चेहरा आज माझ्या समोर अनेक प्रश्न विचारत उभा आहे. मला स्वतःला अपराधी वाटतंय. माझा समाज तिचं रक्षण करण्यात कमी पडला. अशा घटना या पुढे होणार नाहीत, अशा प्रकारचं कृत्य करायला एखादा माथेफिरू धजावणार नाही असा समाज निर्माण होत नाही तोपर्यंत मी तिच्या डोळ्यात डोळे टाकून बोलू शकणार नाही.
यापुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून जे काही शक्य असेल ते सरकार म्हणून आम्ही करूच. एक आई म्हणून माझी महाराष्ट्राला हात जोडून विनंती आहे, आपल्या मुली अशा रस्त्यावर पेटणार नाहीत याची काळजी घ्या. पेटवणाऱ्या हातांमध्ये आपल्याच उदरातून जन्माला आलेला मुलगा नसावा. म्हणून या हातांना चांगले संस्कार द्या.
– यशोमती ठाकूर, दि. ०६/०२/२०२०


























































