
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यापैकी भायखळा पुलाची दुरुस्ती 7 फेब्रुवारी ते 6 मार्चदरम्यान, तर सीएसएमटी पुलाची दुरुस्ती 8 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. भायखळा स्थानकातील कल्याण दिशेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2, 3, 4 ला जोडणारा पादचारी पूल तब्बल एक महिना दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवार, 7 फेब्रुवारीपासून या पुलाची दुरुस्ती सुरू होणार आहे. दोन टप्प्यांत या पुलाचे काम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वरील पुलाचा भाग बंद करण्यात येईल. त्यावेळी फलाट क्र. 1 आणि 2 चा भाग प्रवाशांच्या येण्याजाण्यासाठी सुरू करण्यात येईल. दुसऱया टप्प्यात फलाट क्रमांक 1 आणि 2 चा पुलाचा भाग आणि पायऱया दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत.


























































