
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शर्जिल इमाम याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याप्रकरणी देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या उर्वशी चुडावाला यांना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला. न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांनी उर्वशी चुडावाला यांचा अटकपूर्व जामीन अर्ज 25 हजारांच्या जातमुचलक्यावर मंजूर केला. हा अर्ज मंजूर करतानाच 12 व 13 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात हजेरी लावून त्यांना सहकार्य करावे तसेच परवानगीशिवाय मुंबई-ठाण्याबाहेर जाऊ नये अशी अटही घातली. शर्जिलच्या समर्थनासाठी घोषणाबाजी करणाऱ्या उर्वशी चुडावाला हिने हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सरकारच्या वतीने ऍड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने चुडावाला याना अटक न करण्याचे आदेश दिले.
























































