सडेतोड! विद्या होडे राज्यात प्रथम, वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती वक्तृत्व स्पर्धेला दमदार प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 10 ते 12 फेब्रुवारीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सडेतोड वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. राज्याच्या कानाकोपऱयातून या स्पर्धेत 347 स्पर्धकांनी भाग घेतला. पुणे जिह्यातील प्रा. विद्या होडे या सडेतोड स्पर्धेत राज्यात सर्वप्रथम आल्या आहेत.

सडेतोड वक्तृत्व स्पर्धेत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मुंबई येथून स्पर्धकांनी नोंदणी केली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण’, ‘वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’, ‘महाराष्ट्रावर बोलू काही’, ‘पाणी रे पाणी’, ‘हिंदुस्थानची अर्थव्यवस्था- सद्यस्थिती आणि भवितव्य’, ‘जातीचं काय करायचं… व्यवस्थापन की निर्मूलन’, ‘लोकनायक माननीय उद्धव ठाकरे’ असे सात विषय स्पर्धकांना देण्यात आले होते. या सातही विषयांवर स्पर्धकांनी अतिशय मुद्देसूद व वाखाणण्याजोगे विचार मांडले.

शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे-पाटील, स्पर्धा समन्वयक मारुती साळुंखे व प्रवीण पंडीत यांनी स्पर्धेचे उत्तम आयोजन केले. स्पर्धेच्या कालावधीत विविध मान्यवरांनी उपस्थित राहून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण डॉ. जस्मिन पाटील, डॉ. ज्ञानेश्वर मगर, प्रा. रमेश बुटेरे व अरुण शेलार यांनी केले. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमोल मटकर, अविनाश मालप, मनोज वारंग, सचिन परसनाईक, दिनेश जैन, शाम माने यांनी विशेष परिश्रम घेतले.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय लेख स्पर्धेचे आयोजन केलेले असून ‘असा हवा… नवा महाराष्ट्र’ या विषयावर किमान 2500 शब्दांत लिहून स्पर्धकांच्या व्यक्तिगत माहितीसहित [email protected] या ई-मेलवर पाठवाव्यात.