
>> महेश कुलकर्णी
‘‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडू! एप्रिलमध्ये त्यासाठी ऑपरेशन लोटस राबवणार! जनतेने यांना लोटून दिले तरी यांचे लोटस लोटस चालूच आहे. एप्रिलपर्यंत कशाला, आज नाही, आत्ता हे सरकार पाडा हिंमत असेल तर! गोरगरीबांच्या आशीर्वादाने आलेले हे सरकार अतिशय भक्कम आहे. याचा एक चिराही ढासळणार नाही’’ असे जबरदस्त आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. शेतकरी हाच सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्याचा विकास, त्याची प्रगती हेच सरकारचे ध्येय आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
जळगाव जिल्हय़ातील मुक्ताईनगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषिमंत्री दादाजी भुसे, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील आदींची उपस्थिती होती. अलीकडेच भाजप नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडू अशा वल्गना केल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एप्रिलमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात याचा खरपूस समाचार घेतला. तीस वर्षे आम्ही यांच्यासोबत होतो, पण यांनी माझ्यावर विश्वास दाखवला नाही. ज्यांच्याशी 30 वर्षे संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत माझ्यावर विश्वास दाखवला आणि गोरगरीबांच्या मनात विश्वास निर्माण करणारे सरकार सत्तेवर आले. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना असे भक्कम चिरे आहेत. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे गोरगरीबांच्या आशीर्वादाने हे सरकार आले आहे. तेव्हा सरकार पाडण्याच्या गप्पा कशाला मारता, त्यासाठी एप्रिलचा मुहूर्त कशाला पाहिजे? आज नाही, आत्ता पाडा हिंमत असेल तर! हे सरकार एवढे भक्कम आहे, शरद पवार यांच्यासारखा खमक्या मार्गदर्शक आहे आणि आशीर्वाद मजबूत आहे. त्यामुळे या सरकारचा एक चिराही ढासळणार नाही असा आत्मविश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
सत्तेच्या बाहेर असल्यानंतर काही जबाबदारी नसते, पण आता आपण सत्तेत आहोत. मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. मुख्यमंत्री व्हावे असे माझे कधीही स्वप्न नव्हते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवार यांनी आग्रह केला आणि तीन वेगवेगळय़ा विचारांचे पक्ष एकत्र आले आणि महाराष्ट्रात इतिहास घडला. हे कसे काय घडले, हे किती काळ टिकणार अशी टीका सुरू झाली; पण काळजी करू नका, आता कुठे सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचा विकास हेच आमचे धोरण आहे. रोजगार, शेतकरी कर्जमुक्ती याला प्राधान्य सरकार देत आहे. पहिला निर्णय मी शेतकरी कर्जमुक्तीचा घेतला; पण काहीजणांच्या लगेच पोटात दुखले. दोन लाखांवरच्या शेतकऱयांचे कसे होणार अशी विचारणा करू लागले. सातबारा कोरा कधी करणार, असे प्रश्न यांना पडले. थोडे थांबा! निर्णय घेण्याची ही सुरुवात आहे. शेतकरी प्रगत, संपन्न झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
शरद पवार यांनी आपल्या भाषणात मुक्ताईनगरमध्ये वाघ असल्याचा उल्लेख केला होता. हाच धागा पकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिसरातील व्याघ्र प्रकल्पाचे काम लवकरच करणार, त्याचबरोबर पाणीयोजना, उपसा योजना, व्यावसायिक संकुल, केळीचे प्रश्नही मार्गी लावणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. शेतीचे अनेक प्रश्न आहेत. हे दुखणे दुरुस्त झाले पाहिजे; पण शेतकऱयांनी फक्त शेतीवरच विसंबून न राहता इतर पूरक उद्योगधंद्यांकडेही वळावे असा सल्लाही शरद पवार यांनी दिला. शेतकरी मेळाव्याला उपस्थित महिलांची संख्या पाहून त्यांनी या भागात बचत गटांचे काम सुरू करा अशी सूचनाही केली. या मेळाव्यास आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, विलास पारकर, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, लता सोनवणे, शिरीष चौधरी, अनिल पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आदींची उपस्थिती होती.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला नंबर एक करणार!
राज्यात सत्ताबदल झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात दमदार सरकार आले आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सरकार काम करत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला देशातील नंबर एकचे राज्य करायचे आहे असा विश्वास यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
शेतकऱयांना दिवसा वीज देणार
शेतकरी हाच सरकारचा केंद्रबिंदू आहे. शेतीच्या विकासासाठी खूप काही करायचे आहे, पण सर्वात अगोदर शेतकऱयांना दिवसा वीज देण्याचा विचार असून त्यावर काम चालू असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. आव्हान मोठे आहे; पण आपल्या सगळय़ांच्या सहकार्याने हे शिवधनुष्य पेलणारच, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

























































