अखेर निर्णय झाला… निर्भयाच्या दोषींना 3 मार्चला होणार फाशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना येत्या 3 मार्चला फाशी देण्यात येणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी त्यांच्या फाशीची नवी तारीख जाहीर केली आहे. 3 मार्चला सकाळी 6 वाजता तिहार तुरुंगात त्या नराधमांना फासावर लटकविण्यात येणार आहे.

न्यायालयाच्या निर्णयावर निर्भयाची आई आशा देवी यांनी समाधान व्यक्त केले असले तरी त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. ‘दोषींना फासावर लटकविण्यासाठी तिसऱ्यांदा डेथ वॉरंट काढण्यात आले आहे. यामुळे मी नाराज आहे. आम्हाला या डेथ वॉरंटसाठी खूप खस्ता खाव्या लागल्या. आता मी समाधानी आहे की अखेर डेथ वॉरंट काढले. मला आशा आहे की आता 3 मार्चला तरी त्यांना फासावर लटकवले जाईल’, असे आशा देवी यांनी सांगितले