
शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा होत असल्या आणि भाजप नेते त्या अर्थाने काहीही बोलत असले तरी आता शिवसेना भाजपची हाक ऐकणार नाही, असे शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे. भाजपने शिवसेनेला खोटे पाडण्याचा प्रयत्न केला नसता तर राज्यात राजकीय चित्र वेगळे दिसले असते, असेही देसाई म्हणाले.
एका मराठी वृत्तवाहिनीवर ‘व्हिजन’ मांडताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन भाऊ काही कारणांनी वेगळे झाले तरी नाते तुटत नाही असे म्हटले होते. सुभाष देसाई यांनी याच कार्यक्रमात पाटील यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. नाणार प्रकल्पाला तुमचा विरोध का, या प्रश्नावर देसाई म्हणाले, कोणताही रोजगार, उद्योग वा प्रकल्प आणायचा असेल तर त्यावेळी स्थानिकांच्या भावनांचा विचार करायचा की नाही? आमचे म्हणजेच शिवसेनेचे ठाम मत आहे की, स्थानिकांना हवे असेल तर त्याचे स्वागत करावे. स्थानिकांना नको असेल तर ते त्यांच्या माथी मारायचे नाही. समृद्धी महामार्गाला होणारा विरोध आता मावळला असून काम धूमधडाक्यात सुरू आहे. लोकांची समजूत काढली, त्यांची भीती दूर केली. महामार्गाशेजारी औद्योगिक क्षेत्र निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे स्थानिकांचा आता विरोध नाही, असेही देसाई म्हणाले.



























































