नाइट लाइफ मुंबईसाठी गरजेचे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे ‘व्हिजन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aaditya-thackeray

मुंबई 24 तास अर्थात नाइट लाइफ ही संकल्पना या शहरासाठी गरजेची आहे असे स्पष्ट व्हिजन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मांडले. या संकल्पनेतून रोजगार संधी उपलब्ध तर होणार आहेच, पण ही मूळ संकल्पनाच खूप सोपी आहे. मुंबईत कामाची काहीच वेळ निश्चित नसते. तसेच येथे पर्यटकही येतात. त्यांच्यासाठी रात्री-अपरात्री जेवणाची वा इतर सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या एवढीच ही संकल्पना आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

एका मराठी वृत्तवाहिनीवर आदित्य ठाकरे यांनी पर्यटन, पर्यावरण आणि राज्यशिष्टाचार या तिन्ही खात्यांचे व्हिजन मांडले. त्याला उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आदित्य ठाकरे म्हणाले, नाइट लाइफमुळे मुंबईच्या अर्थव्यवस्थेत निश्चितच हातभार लागणार आहे. जगभरातील इतर देशांमधील अनेक शहरे रात्रंदिवस जागी असतात. मग आपण मुंबईवरही विश्वास टाकला पाहिजे. मुंबईकर रात्रभर नुसता गोंधळ घालणार नाहीत. मुंबईकरांवर विश्वास न ठेवणे हा त्यांच्यावर अन्याय आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

वातावरण बदलाबाबत जनजागृती
वातावरणातील बदलांमुळे पर्यावरण खात्यासमोर मोठे आव्हान आहे. म्हणून त्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. प्रत्येक शाळा, कॉलेज, सोसायटीत जाऊन वातावरणातील बदलाबाबत माहिती दिली जाईल असे आदित्य ठाकरे म्हणाले. राज्यातील उद्योगांना पर्यावरणासंबंधीच्या नियमांचे पालन करावेच लागेल, नाहीतर त्यांच्यावर कारवाई होईल. पर्यावरणाची हानी सहन केली जाणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी बजावले.

मुंबईसाठी महापालिका खूप काही करते आहे
मुंबईसाठी, मुंबईकरांच्या स्वास्थ्यासाठी महापालिका खूप काही करते आहे असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईत कचऱयाची समस्या मोठी होती, पण कचऱयाच्या वर्गीकरणाला सुरुवात झाली आणि मुंबईतील कचरा 10 हजार टनांवरून साडेसहा हजार टन इतका खाली आला. मुंबईत पावसाळय़ात पाणी साचू नये यासाठी अनेक कामे सुरू आहेत. शिवाय खड्डामुक्त मुंबईसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

दिल्लीतील बैठकीत ‘एन्व्हायर्नमेंट’ उत्तम
शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक झाली. कशी झाली ती बैठक असा प्रश्न केला असता आदित्य ठाकरे मिष्कीलपणे म्हणाले, दिल्लीत ‘पर्यटना’ला गेलो. ‘एन्व्हायर्नमेंट’ उत्तम होते आणि ती भेट ही ‘राजशिष्टाचारा’चा भाग होता. या उत्तरावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. पंतप्रधानांशी अनेक विषयांवर उत्तम चर्चा झाली. राज्याच्या जीएसटी रकमेचा परतावा जलद मिळावा अशी मागणी तर करण्यात आलीच, पण पीएमसी बँक खातेदारांना दिलासा देणारा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंतीही पंतप्रधानांना केल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आहे तेच पुनरुज्जीवित करूया!
पर्यटन क्षेत्रात खूप काही करण्यासारखे आहे असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले, जी खाती कुणीही घेतली नाहीत ती खाती मी मागून घेतली. या खात्यांमार्फत मला चांगले काम करण्याची इच्छा आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मी महाराष्ट्र समजावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला महाराष्ट्रातील पर्यटनक्षमता दिसली. येथे नवे काही करता आले नाही तरी चालेल, पण आहे तेच जर आपण सुंदररीत्या पुनरुज्जीवित केले तर पर्यटनाच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.