ना. म. जोशी मार्गच्या बीडीडी चाळींतील 260 रहिवाशांना घरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ना.म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी 260 रहिवासी स्थलांतरित झाले आहेत. म्हाडामार्फत 15 मार्च रोजी काढण्यात येणाऱया लॉटरीमध्ये या रहिवाशांना नवीन घरे द्यावीत असे आदेश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

ना.म. जोशी मार्गाच्या बीडीडी चाळींतील 800 पैकी 260 रहिवासी पहिल्या टप्प्यात संक्रमण शिबिरात स्थलांतरित झाले आहेत. उर्वरित रहिवाशांनी अजून घरे रिकामी केली नाहीत. ज्या 260 रहिवाशांनी घरे रिकामी केली त्यांच्यासाठी सोडत काढून त्यांना ऍग्रिमेंटसह नवीन घरे द्यावीत, त्यामुळे उर्वरित रहिवाशांमध्ये विश्वास निर्माण होऊन ते घरे रिकामी करतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प विशेष प्रकल्प म्हणून हाताळला जावा व कामाला गती द्यावी अशा सूचना देऊन ते पुढे म्हणाले, तिथे राहत असलेल्या रहिवाशांमध्ये जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनाही ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये स्थलांतरित करावे. या कामासाठी उपजिल्हाधिकारी यांच्या नियुक्तीसह स्वतंत्र यंत्रणा तयार करावी. सर्व 800 रहिवासी स्थलांतरित होताच तातडीने पुनर्वसनाचे काम सुरू करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत, माजी मंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता व सबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुनर्विकासाला वेग द्या
ना. म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाप्रमाणेच नायगाव, शिवडी आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला वेग द्यावा, टप्प्यांची निश्चिती करून येथेही काम सुरू केले जावे अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.