
ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदिंडी, बारा बलुतेदारांचे चित्रमय प्रदर्शन तसेच मराठीची सांस्कृतिक रूपे उलगडून दाखवणारी गाणी अशा बहारदार सांस्कृतिक वातावरणात विधिमंडळात आज मायमराठीचा जागर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘इये मराठीचिये नगरी’ कार्यक्रम झाला.
‘इये मराठीचिये नगरी’ या संगीतमय कार्यक्रमाचा आनंद सदस्यांनी घेतला. गायक नचिकेत देसाई, विद्या करलगीकर, डॉ. राम पंडित यांनी विविध गाणी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांचे तर संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे होते. ‘काळ देहासि आला खाऊ’, ‘खेळ मांडियेला’, ‘विंचू चावला’, ‘अरे खोप्या मंदी खोपा’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘निजरूप दाखवावे’, ‘नरवर कृष्णा समान’, ‘चिन्मया सकल हृदया’ आदी गाणी यावेळी सादर झाली. या कार्यक्रमाला गिरगाव येथील सेंट टेरेसा शाळेचे विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात विशेष सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले. याची सुरुवात शानदार ग्रंथदिंडीने आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. झाली. विधान भवनाच्या प्रांगणात भरविण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदिंडीची पालखीही मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनी स्वतःच्या खांद्यावरून वाहिली.
मराठी भाषा दिनानिमित्त विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात
‘इये मराठीचिये नगरी’ हा कार्यक्रम संपन्न झाला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. त्यानंतर डॉ. नीलिमा गुंडी यांचे ‘मराठी भाषा काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान झाले. याअंतर्गत नीलिमा गुंडी यांनी मराठीची इतिहासातील सांस्कृतिक बलस्थाने उलगडली. राजभाषा समाजाचा अंतस्वर असते. तिची पुढची पिढी निर्माण व्हावी लागते. सरकारने सर्व शैक्षणिक मंडळांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे मराठीच्या विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे, असे डॉ. गुंडी म्हणाल्या. मराठीच्या भविष्यावर त्या म्हणाल्या, पारंपरिक चौकटीबाहेरचे अभ्यासक्रम सुरू केले पाहिजेत. आजच्या काळात मराठी भाषा प्रशिक्षकांची गरज असून असे प्रशिक्षक तयार करणाऱया अभ्यासक्रमाची गरज असल्याचे मत डॉ. गुंडी यांनी व्यक्त केले. जाहिरात क्षेत्रात तांत्रिक अनुवादाला खूप मागणी आहे. औषध आणि अन्नपदार्थ आदींच्या वेष्टनावरील मजकूर मराठीत असला पाहिजे, अशा काही उपाययोजना सुचवल्या.






























































