
उत्तर प्रदेशातील उन्नावमधील बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर याला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. त्याला शिक्षा काय द्यायची याचा निर्णय 12 मार्च रोजी सुनावण्यात येणार आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने हा आदेश दिला आहे. पीडितेच्या वडिलांना अत्यंत निर्घृणपणे ठार मारण्यात आले असं म्हणत न्यायालयाने सेंगर याला दोषी ठरवलं आहे. सेंगसह या प्रकरणात 11 जणांना आरोपी बनविण्यात आले होते. यातील 4 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. उर्वरीत सात जणांना मृतकाच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूबद्दल जबाबदार धरण्यात आलं आहे.
Delhi’s Tis Hazari Court holds guilty the 7 accused including expelled BJP MLA Kuldeep Singh Senger (who is already convicted in rape case) for the custodial death of Unnao rape victim’s father; 4 other acquitted by the Court pic.twitter.com/XJtEw9UDQV
— ANI (@ANI) March 4, 2020
सेंगर याच्यासह ज्या सात जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे त्यामध्ये उत्तर प्रदेशातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या सातही जणांना दोषी ठरवताना न्यायाधीश म्हणाले की ‘हा माझ्या आयुष्यातील अत्यंत आव्हानात्मक खटला होता’. न्यायाधीशांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI चं कौतुक केलं. त्यांनी पीडितेच्या वकिलांचेही कौतुक केलं. न्यायाधीशांनी सेंगर याला दोषी ठरवल्यानंतर विचारलं की तुला काही म्हणायचं आहे का , यावर त्याने मी निर्दोष असल्याचं म्हटलं. सेंगर याचा पीडितेच्या पित्याला ठार मारण्याचा इरादा नव्हता, मात्र पोलीस कोठडीतील बेदम मारहाणीमुळे पित्याचा मृत्यू झाल्याचं न्यायालयाने म्हटल्याचं PTI या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.
Unnao case: Court says Kuldeep Sengar had no intention of killing rape victim’s father, death caused by brutal beating
— Press Trust of India (@PTI_News) March 4, 2020
प्रकरण नेमकं काय आहे ?
उन्नावमधल्या बलात्कार पीडितेने कुलदीप सेंगर यानेच आपल्यावर बलात्कार केल्याचं सांगितल्यानंतर हे प्रकरण दडपण्याचा सेंगरने पूर्ण प्रयत्न केला होता. पीडिता ही अल्पवयीन होती आणि तिच्यावर झालेल्या या अत्याचाराच्या विरोधात तिचे वडीलही लढत होते. एप्रिल 2018 मध्ये तिच्या वडिलांना मारहाण करण्यात आली होती आणि अटकही करण्यात आली होती. साधारणपणे 6 दिवसांनी म्हणजेच 9 एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे बलात्काराचा खटला सीबीआयकडे वर्ग केला होता. सेंगरवर पीडिता, तिचे कुटुंबी आणि वकील हे गाडीतून जात असताना त्यांना अपघातात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. सेंगरला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 डिसेंबर 2019 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला भाजपमधूनही काढून टाकण्यात आलं आहे.






















































