श्रीगोपाळबुवा तथा प्रीतीनंद स्वामीकुमार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

श्रीस्वामीशिष्य श्रीगोपाळबुवा केळकर यांच्या समाधीला नुकतीच 100 वर्षे पूर्ण झाली. त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणारा हा लेख.

परमपूज्य हरिभाऊ तावडे अर्थात ‘श्रीस्वामीसुत’ यांच्या हातून श्रीस्वामी समर्थांनी मुंबापुरी गादी (कांदेवाडी-गिरगाव, मुंबई) स्थापन केली. चैत्र शुद्ध द्वितीया, सन 1870मध्ये श्रीस्वामीसुतांनी सर्वप्रथम श्रीस्वामीजयंती थाटामाटात उत्सवी सोहळा करून साजरी केली आणि, पुढील वर्षी सन 1871 मध्ये त्यांनी हा सोहळा अक्कलकोट येथे केला. यावेळी गोपाळबुवा अवघ्या पंचविशीत होते. त्यावेळी बुवांना श्रीस्वामी समर्थकृपेने ‘आपणांस येत्या काळात श्रीस्वामीसुतांचे सान्निध्य लाभणार आहे’ याची पुसटशी शंकादेखील आली नाही.

तोवर व्याधीमुक्त झालेल्या गोपाळबुवांचा शोध घेत त्यांची पत्नी अक्कलकोट येथे आली. काही दिवस श्रीस्वामीसेवेत राहिल्यावर एके दिवशी श्रीस्वामी समर्थांनी गोपाळबुवांच्या ओंजळीत दोन नारळ व एक खारीक टाकली आणि त्यांना मुंबई येथे धाडले. गोपाळबुवा मुंबापुरी गादीची सेवा करू लागले. येथे अल्पकाळासाठी का होईना, त्यांना श्रीस्वामीसुतांचा अपार सहवास लाभला याचे कारण श्रीस्वामीसुत पुढे सन 1874 च्या श्रावणमासात श्रीस्वामी समर्थचरणी विलीन झाले. मात्र, त्याआधी किमान वर्षभरापूर्वी सन 1873 मध्ये श्रीस्वामीसुतांनी मुंबापुरीगादीचे मुख्य सेवेकरी श्रीब्रह्मचारीबुवा यांस चिपळूण येथे मार्कंडी गावात श्रीस्वामी समर्थांच्या पादुकांची स्थापना करण्यास सांगितले होते. श्रीब्रह्मचारीबुवांनी श्रीस्वामींच्या संगमरवरी पादुकांची स्थापना करून नजीकच राहणाऱया एका शिक्षकावर पादुका पूजनाची जबाबदारी सोपवली अन् ते माघारी परतले. त्यानंतर, श्रीस्वामीसुतांनी ज्येष्ठ मास, सन 1874 मध्ये योग्य वेळी गोपाळबुवांना पत्नीसह मार्कंडी येथे जाण्याचा आदेश दिला. गृहस्थाश्रमी गोपाळबुवांना परमार्थाचे साधन प्राप्त करून देण्यामागे श्रीस्वामीसुतांचे बरेच मोठे योगदान आहे.

मार्कंडी गाव आज जरी चिपळूणचा भाग असले तरीदेखील त्याकाळी ते गावाबाहेर घनदाट जंगलसदृश परिसरात होते. दिवसाढवळ्याही लोक तिथे जाण्यास कचरत असत. मात्र, गोपाळबुवा श्रीस्वामीसुतांच्या आज्ञेनुसार तेथे पत्नीसमवेत राहिले. दर गुरुवारी गावात जाऊन भिक्षा मागणे आणि जे मिळेल त्यात समाधान मानून राहणे असे खडतर तप आचरून बुवा जास्तीतजास्त काळ श्रीस्वामीचिंतनात व्यतीत करीत असत. श्रीस्वामीसुतांनी सांगितल्यानुसार, श्रीस्वामी समर्थांच्या नित्योपासनेचा काकड आरतीपासून शेजारतीपर्यंतचा दिनक्रम बुवांनी कटाक्षाने पाळला. सकाळी पादुकांचे पूजन झाल्यावर विठ्ठलाईच्या देवळात ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवतादी ग्रंथांचा अभ्यास, सायंकाळी रामतीर्थावर सायंसंध्या आणि त्यानंतर मठात येऊन सांजआरती असा गोपाळबुवांचा नित्य दिनक्रम सुरू झाला. नेमनियमांचे कठोर पालन आणि खडतर साधना यांमुळे बुवांची तपस्वी वृत्ती अधिकाधिक प्रभावी होत गेली व त्याची प्रचिती पंचक्रोशीतील अनेकांना जाणवू लागली. श्रीस्वामी समर्थांचे कृपाबळ, पाठीशी असलेला श्रीस्वामीसुतांचा आशीर्वाद आणि अंगभूत तपोबलाचा प्रभाव यामुळे गोपाळबुवांकडे येणाऱया रंजलेल्या-गांजलेल्या समस्याग्रस्तांना बुवांच्या रूपाने सुयोग्य मार्गदर्शन प्राप्त झाले आणि पाठीशी उभा राहणारा भरभक्कम आधार मिळाला.

गोपाळबुवांनी चिपळूण व आसपासच्या परिसरात खऱया अर्थाने श्रीस्वामी समर्थ संप्रदाय रुजविला. श्रीस्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ या सिद्धमंत्राचा जयघोष कोकणच्या भूमीवर उच्चारवाने गर्जू लागला, त्याचे समग्र श्रेय गोपाळबुवांपाशी जाते. याचे कारण, जळी-स्थळी-काष्ठाr-पाषाणी बुवांच्या मनांत केवळ श्रीस्वामी समर्थांचे रूप आणि ध्यान असे. श्रीस्वामी समर्थांच्या सहवासात बराच काळ राहिल्यामुळे त्यांच्या अनेक आठवणींमध्ये गोपाळबुवा नित्य हरवून जात. कुण्या भक्ताने श्रीस्वामी समर्थांचा उल्लेख केला तरी गोपाळबुवांच्या मुखातून श्रीस्वामी महाराजांच्या अनेक आठवणी प्रकट होत. त्यांच्या प्रभावी निवेदन शैलीमुळे ऐकणाऱयाच्या नजरेसमोर साक्षात अक्कलकोट व त्यात वास्तव्य करून राहिलेल्या अतर्क्य अवधूत श्रीस्वामी समर्थ महाराजांची छबी प्रकट होत असे. यातूनच पुढे, गोपाळबुवांनी मोडी लिपीमध्ये संकलित केलेल्या या हृद्य आठवणी श्रीस्वामी संप्रदायाकरिता मौल्यवान ठरल्या. आजही, चिपळूणच्या श्रीस्वामीमठामध्ये गोपाळबुवांच्या लेखणीतून साकारलेले श्रीस्वामी समर्थांच्या अमूल्य अशा स्मरणसंचिताचे हे अलौकिक शब्दवैभव आपणांस पाहावयास मिळते.

मार्कंडी येथे आल्यावरही गोपाळबुवा दरवर्षी पायी वारी करीत अक्कलकोट येथे जात. सन 1878 मध्ये श्रीस्वामी समाधिस्थ झाल्याची तार बुवांना आली तेव्हा श्रीस्वामीविरह सहन न झाल्याने गोपाळबुवा अन्नपाण्याचा त्याग करते झाले. अशा शोकाकुल अवस्थेत तीन दिवस गेले तेव्हा, श्रीस्वामी समर्थांनी प्रत्यक्ष दर्शन देत,‘अरे, अन्नपाणी कशास सोडतो, मी इथेच आहे’ असे सांगून बुवांना आश्वस्त केले. श्रीस्वामींचे हे त्रिकालबाधित्व सत्यवचन गोपाळबुवांचा संप्रदायातील अधिकार दर्शविते. स्वतःला साधा सेवक म्हणवून घेणारे बुवा त्यांच्या दास्यभक्तीमुळे उपास्य देवतेच्या, अर्थात श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या अंतरंगात महत्त्वाचे स्थान राखून होते हेच यातून समोर येते!

मार्कंडी, चिपळूण येथे श्रीस्वामी समर्थ मठ स्थापन केल्यानंतर आजूबाजूच्या गावात जाऊन श्रीस्वामीकार्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी गोपाळबुवांनी चांदीच्या पादुकांचा जोड करून घेतला. या पादुकांच्या साक्षीने प्रत्येक चातुर्मासात गोपाळबुवा आणि त्यांचे भक्त पंचक्रोशीतील अन्य गावांत जाऊन सप्ताह करीत. बुवांनी मठामध्ये श्रीस्वामीजयंतीचा सप्ताह करण्यास प्रारंभ केला. या सप्ताहामध्ये परिसरात सवाद्य भिक्षाफेरी काढली जाते. उत्सवकाळात दुपारी भोजन आणि त्यानंतरचा अर्धा तास वगळता उर्वरित संपूर्ण वेळ श्रीस्वामींच्या नामस्मरणात अथवा श्रीस्वामीचिंतनात घालवावा असा दंडक गोपाळबुवांनी घातला.

श्रीस्वामी समर्थ संप्रदायाच्या विस्तारात अखंड बुडालेल्या गोपाळबुवांनी ‘प्रीतीनंद स्वामीकुमार’ हे सांप्रदायिक नाव धारण केले. श्रीस्वामी संप्रदायासाठी आयुष्याची पाच दशके व्यतीत करणाऱया आणि श्रीकरुणास्तोत्र, साधनविवेकसारामृत यांसारख्या भावोत्कट रचना व श्रीस्वामीचरित्र अशी मौलिक लेखन संपदा निर्माण करणाऱया गोपाळबुवांनी त्यांच्या निर्याणाची, ‘जर काही विचारायचे असेल तर तात्काळ या, शेवटचे पंधरा दिवस मी मौन पाळणार आहे’ अशी स्पष्ट सूचना दिली आणि फाल्गुन शु. 11, शके 1841 (सन 1920) मध्ये ते देह विसर्जित करते झाले. मठाच्या आवारातच त्यांची समाधी बांधण्यात आली.

श्रीस्वामी संप्रदायातील तेजस्वी रत्न असलेल्या गोपाळबुवांची परंपरा पुढे त्यांचे सुपुत्र दत्तूबुवा आणि हरिबुवा यांनी यथाशक्ती चालविली. त्यानंतर कृष्णबुवा, गोविंदराव, नारायणराव आणि सध्या ही परंपरा रामचंद्र, अरुण आणि प्रसाद निगुतीने सांभाळत आहेत. (उत्तरार्ध)

[email protected]